भारतीय नौदलासाठी लागणारी संरक्षक उपकरणे आता चाकणमध्ये बनणार आहेत. ‘महिंद्रा डिफेन्स नेव्हल सिस्टिम्स’तर्फे चाकण येथे कंपनीच्या नवीन उपकरण निर्मिती यंत्रसंचाचे मंगळवारी उद्घाटन करण्यात आले. नौदलासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध यंत्रणांबरोबरच पाण्याच्या खाली काम करू शकणाऱ्या यंत्रणांचेही उत्पादन या कारखान्यात केले जाणार असल्याची माहिती कंपनीतर्फे देण्यात आली. महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा, तसेच प्रमुख ब्रँड अधिकारी श्रीप्रकाश शुक्ल या वेळी उपस्थित होते.
कंपनीने पुरवलेल्या माहितीनुसार पाण्यावर तरंगणारी शत्रूची जहाजे आणि पाणबुडय़ा उडवून देण्यासाठी वापरले जाणारे ‘सी माइन’ हे उपकरण, शत्रूच्या पाणतीरांपासून आपल्या जहाजांचे संरक्षण करणारे ‘डेकॉय लाँचर’, ‘सोनोबुऑय’ ही पाण्याखाली शोध घेणारी यंत्रणा, पाणतीरांचे वेगवेगळे भाग, पाणतीरांच्या प्रक्षेपणासाठी हलक्या तसेच अवजड लाँचर यंत्रणा, नौदलाचे अग्निबाण आणि विस्फोटके यांमध्ये वापरले जाणारे भाग ही उपकरणे चाकणमध्ये बनणार आहेत.
कंपनी लष्करासाठी वापरल्या जाणाऱ्या भू-यंत्रणा आणि रडार यंत्रणाही बनवत असून या यंत्रणांचा कारखाना फरिदाबादजवळ असल्याचे या वेळी सांगण्यात आले. 

Story img Loader