पुणे : भारतातील खाद्यतेलाच्या आयातदारांनी पामतेलाच्या वाढलेल्या दराचा फायदा घेण्यासाठी पामतेल आयातीचे सुमारे एक लाख टनाचे सौदे रद्द करून परस्पर अन्य देशांना, व्यापाऱ्यांना विकले आहेत. सौदे रद्द झाले तरीही ऐन दिवाळीत तेलाची दरवाढ होण्याची किंवा तेलाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता नाही.

द सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोशिएसनचे (एसईए) कार्यकारी अध्यक्ष डॉ. भारत मेहता म्हणाले, भारताने खाद्यतेलाच्या आयात शुल्कात वाढ केली आहे. इंडोनेशिया पामतेलाचा सर्वात मोठा उत्पादक आहे, पण, इंडोनेशियात पामतेलाचे उत्पादन घटले आहे, त्यात भर म्हणून बी- ४० धोरणांतर्गत पामतेलापासून बायोडिझेल तयार करण्यावर भर दिला आहे. दुसऱ्या क्रमांकाचा पामतेल उत्पादक असलेल्या मलेशियाने वाढविलेल्या निर्यात शुल्कामुळे जागतिक बाजारात पामतेलाच्या दरात वाढ झाली आहे.

हेही वाचा : आघाडीच्या जागा वाटपात डावे पक्ष, संघटना दुर्लक्षित ? डावे पक्ष, संघटनांनी दिला महाविकास आघाडीला गंभीर इशारा

देशातील बंदरावर विविध देशातून आयात होणाऱ्या तेलामध्ये पामतेल सर्वात स्वस्त दराने आयात होत असते. भारताने आयात शुल्क वाढविण्यापूर्वी जुलै महिन्यात कच्चे पामतेल ९७९ डॉलर प्रतिटन दराने आयात होत होते. सध्या १०११ डॉलर प्रतिटन दराने आयात होत आहे. पामतेलापेक्षा चांगला दर्जा आणि आरोग्यदायी असलेले कच्चे सोयाबीन १०१५ डॉलर प्रतिटन दराने आणि सूर्यफूल तेल १०१९ डॉलर प्रतिटन दराने आयात होत आहे. जुलै महिन्यात कच्चे सोयाबीन १०५४ आणि कच्चे सूर्यफूल तेल १०४३ डॉलर दराने आयात होत होते. सूर्यफूल तेल सर्वात महाग दराने आयात होते. सध्या कच्चे पामतेल, सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेलाच्या दरात फारसा फरक नाही. त्यामुळे खाद्यतेलाचे आयातदार पामतेलाची आयात कमी करून सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाची आयात करीत आहेत.

हेही वाचा : Maharashtra Rain News: पावसाची उघडीप पाच ऑक्टोंबरपर्यंत? जाणून घ्या मोसमी पावसाच्या परतीच्या प्रवासाची स्थिती

दिवाळीत दरवाढीची शक्यता नाही

खाद्यतेलाच्या व्यापाऱ्यांनी जागतिक बाजारात वाढलेल्या दराचा फायदा घेण्यासाठी पामतेल आयातीचे सौदे रद्द केले आहेत, हा व्यापाराचा एक भाग आहे. सध्या पामतेल, सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेलाच्या दरात फारसा फरक राहिलेला नाही. त्यामुळे व्यापारी सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेल आयात करीत आहेत. देशात खाद्यतेलाचा पुरेसा साठा आहे, तसेच देशात उत्पादित झालेल्या तेलबियांचे गाळपही सुरू होईल. त्यामुळे दिवाळीत टंचाई किंवा दरवाढ होण्याची शक्यता नाही, अशी माहिती शेतीमाल बाजार व्यवस्थेचे अभ्यासक श्रीकांत कुवळेकर यांनी दिली.