पुणे : ‘इंडियन रोड काँग्रेस’च्या निकषांचे पालन न करता बांधण्यात आलेले शहरातील गतिरोधक (स्पीड ब्रेकर) काढण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात विविध रस्त्यांवरील २५० गतिरोधक काढून टाकण्यात आले आहेत.

शहरातील रस्त्यांवर गतिरोधक उभारताना ते कसे असावेत, याचे नियम आहेत. मात्र, त्यांकडे दुर्लक्ष करून अनेक रस्त्यांवर चुकीच्या पद्धतीने गतिरोधक बांधण्यात आलेले आहेत. त्याचा वाहनचालकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे करण्यात आल्या होत्या. या तक्रारींनंतर पालिकेच्या पथ विभागाने शहरातील गतिरोधकांचे सर्वेक्षण केले. त्यात ६६७ गतिरोधक अशास्त्रीय पद्धतीने उभारण्यात आल्याचे समोर आले होते. त्यामुळे हे गतिरोधक काढून टाकण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेऊन कार्यवाही सुरू केली आहे.

हेही वाचा : दुसरी महापालिका ही पुण्याची निकड ? कोणी मांडली भूमिका

पुणे शहरात सुमारे दोन हजार किलोमीटरचे रस्ते आहेत. महापालिकेच्या पथ विभाग, प्रकल्प विभाग आणि क्षेत्रीय कार्यालयांकडून विविध रस्त्यांवर वाहनांचा वेग रोखण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे गतिरोधक उभारले जात होते. रस्त्यांवर गतिरोधक उभारताना त्याची उंची, रुंदी, तसेच आकार किती असावा, याचे निकष ‘इंडियन रोड काँग्रेस’ने निश्चित केले आहेत. कोणत्या रस्त्यावर किती मोठे गतिरोधक असावेत, हेही त्यात नमूद आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत उभारलेल्या गतिरोधक बांधले जातात. त्याचा फटका वाहनचालकांना सहन करावा लागत होता. अशास्त्रीय गतिरोधकांचा अंदाज न आल्याने अनेक चौकांमध्ये वाहतूककोंडी होत होती. त्यामुळे पोलिसांच्या वाहतूक शाखेसह नागरिकांनीही गतिरोधक काढून टाकण्याची मागणी पालिकेकडे केली होती. त्यानुसार अशास्त्रीय गतिरोधक काढून टाकण्याची मोहीम पालिकेने हाती घेतली आहे.

वाहतुकीला अडथळा ठरणारे गतिरोधक काढण्याचे काम पालिकेने सुरू केले आहे. पालिकेने केलेल्या पाहणीत ६६७ अशास्त्रीय गतिरोधक आढळून आले. त्यांपैकी पहिल्या टप्प्यात २५० गतिरोधक काढण्यात आले आहेत. ‘इंडियन रोड काँग्रेस’च्या निकषांचे पालन करून, तसेच वाहतूक पोलिसांच्या पडताळणीनंतरच नव्याने गतिरोधक उभारले जातील, असे पथ विभागाचे अधिक्षक अभियंता साहेबराव दांडगे म्हणाले.

हेही वाचा : पिंपरी : औद्योगिक क्षेत्रात नव्या महापालिकेसाठी हालचाली

महापालिकाच अनभिज्ञ

पुणे शहरातील कोणत्या भागात नक्की किती गतिरोधक आहेत, याची कोणतीही माहिती महापालिकेकडे उपलब्ध नाही. महापालिकेच्या जुन्या हद्दीत १४०० किलोमीटरचे रस्ते असून, नवीन ३४ गावांच्या समावेशानंतर या रस्त्यांमध्ये पाचशे ते सहाशे किलोमीटर रस्त्यांची भर पडली आहे. त्यामुळे या सर्व रस्त्यांचे सर्वेक्षण महापालिकेकडून करण्यात येत आहे. त्यानुसार गतिरोधकांची संख्या निश्चित केली जात आहे.

Story img Loader