पुणे : गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय खेळणी उद्योगाचा जगभरात खुळखुळाट सुरू झाला आहे. खेळणी उद्योगाने आर्थिक वर्ष २०१४-१५ च्या तुलनेत आर्थिक वर्ष २०२२-२३मध्ये उल्लेखनीय वाढ नोंदवली आहे. खेळण्यांच्या आयातीत ५२ टक्के घट झाली आहे, तर देशात उत्पादित खेळण्यांच्या निर्यातीत २३९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयासाठी भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) लखनौ यांनी भारतीय खेळणी उद्योगाच्या केलेल्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. सन २०१४ ते २०२० या सहा वर्षांच्या काळात खेळणी उद्योगाची उलाढाल दुपटीने वाढली आहे. उद्योगासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आयात ३३ वरून १२ टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. देशात उत्पादित झालेली खेळणी कोणत्याही आयात शुल्काविना संयुक्त अरब अमिराती आणि ऑस्ट्रेलियाच्या बाजारपेठेत जात आहेत. शून्य आयात शुल्कामुळे भारतीय खेळणी थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्पर्धा करू लागली आहेत.
जागतिक खेळणी उद्योगात सध्या चीन आणि व्हिएतनामचा मोठा वाटा आहे. त्यांना पर्याय म्हणून भारतीय खेळण्यांकडे पाहिले जात आहे. तंत्रज्ञानातील प्रगती, ई-आर्थिक व्यवहार, निर्यातीला प्रोत्साहन, सांस्कृतिक विविधतेचे जतन, स्थानिक कारागिरांचे योगदान अशी एक मजबूत साखळी तयार झाल्याने खेळणी उद्योग भरभराटीला आल्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने नमूद केले आहे.
केंद्राचे सकारात्मक पाठबळ
केंद्र सरकारने आयात होणाऱ्या खेळण्यांवरील कर २० वरून वाढवून २०२० मध्ये ६० टक्के आणि २०२३ मध्ये ७० टक्के केला. देशी खेळणी उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी देशी उद्योजकांना उत्पादनाचे १२०० परवाने देण्यात आले, तर ३० परदेशी उद्योजकांना देशात उत्पादन करण्यासाठी परवाने देण्यात आले. खेळणी उद्योगासाठी सामूहिक विकास योजना (क्लस्टर) राबविण्यात आली. सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांचे देशात १९ सामूहिक विकास केंद्र स्थापन करण्यात आले आहेत.
हेही वाचा : स्त्रिया आणि मुलं मोजताहेत युद्धाची किंमत!
सावंतवाडीतून निर्यात वाढली
सावंतवाडीमध्ये तयार होणाऱ्या खेळण्यांची करोनानंतर मोठ्या प्रमाणावर निर्यात सुरू झाली आहे. मऊ लाकडापासून तयार होणारी खेळणी हे सावंतवाडीत तयार होणाऱ्या खेळण्यांचे वैशिष्ट्य आहे. चीनमधून आयात होणाऱ्या खेळण्यांवर मोठ्या प्रमाणात आयातकर आकारण्यात येत असल्यामुळे देशात खेळणी आयातीचे प्रमाणही कमी झाले आहे. त्याचाही फायदा उत्पादकांना होत आहे, असे सावंतवाडीतील खेळणी उत्पादक अमित चित्रे म्हणाले.