भारताचा विकास दर हा जगाच्या तुलनेच चांगला असल्याचे मत ज्येष्ठ उद्योजक आणि फोर्स मोटर्सचे अध्यक्ष अभय फिरोदिया यांनी व्यक्त केले आहे. त्याचबरोबर देशातील ऑटोमोबाईल क्षेत्राला चांगले भविष्य असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. पुण्यात फोर्स मोटर्सच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
सध्या देशातील अर्थव्यवस्थेची मंदावलेली गती आणि ऑटोमोबाईल क्षेत्रावर त्याचा झालेला परिणाम यांसदर्भात विचारलेल्या एका प्रश्नावर उत्तर देताना फिरोदिया म्हणाले, “देशातील ऑटोमोबाईल क्षेत्राचे भविष्य उज्वल आहे. आर्थिक वाढीबाबत जगातील इतर देशांच्या तुलनेत विचार केला तर आपल्या देशाचा विकासदर हा चांगला आहे.”
दरम्यान, सरकारी धोरणं आणि जाचक नियमांचा फटका ऑटोमोबाईल क्षेत्राला बसत असल्याचे यावेळी फिरोदिया यांनी सांगितले. ते म्हणाले, “ऑटोमोबाईल क्षेत्रातील व्यावसायिकांना प्रामुख्याने दोन अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पहिली अडचण म्हणजे पायाभूत सुविधा आणि दुसरी म्हणजे जाचक नियम. आपण सध्या ज्या पायाभूत सुविधा निर्माण करीत आहोत, त्या पंधरा वर्षांपूर्वीच देशात निर्माण व्हायला हव्या होत्या, अशी भुमिका त्यांनी यावेळी मांडली. तर सरकारने यापूर्वी सरकारी एसटी, बसेसच्या भल्यासाठी ऑटोमोबाईल क्षेत्रावर विशेषतः मोबिलिटी वाहनांवर जाचक नियम घातले होते. मात्र, आता या एसटी बसेसच्या व्यवस्थेचंच खासगीकरण होत आहे. त्यामुळे या नियमांमध्ये काळानुरुप बदल होणे गरजेचे आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.