पुणे : ‘आपण देश म्हणून, समाज म्हणून एक असायला हवे. समाजातले विविध घटक, वेगवेगळे विचार एकत्र आल्यानेच या देशाची प्रगती झाली. आता भारताचा हिंदूू पाकिस्तान होऊ न देण्याची आपली जबाबदारी आहे,’ असे मत ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांनी सोमवारी व्यक्त केले.
पत्रकार वरुणराज भिडे मित्र परिवारातर्फे देण्यात येणाऱ्या ‘वरुणराज भिडे स्मृती’ पुरस्कारांचे वितरण परुळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला खासदार डॉ. अमोल कोल्हे, उल्हास पवार, अंकुश काकडे आदी उपस्थित होते.
नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘लोकसत्ता’चे प्रतिनिधी दिगंबर शिंदे यांना ‘आश्वासक पत्रकार’ (ग्रामीण) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच, ज्येष्ठ पत्रकार यदू जोशी यांना मुख्य पुरस्कार, प्रशांत आहेर यांना आश्वासक पत्रकार (शहर) आणि मिकी घई यांना आश्वासक पत्रकार (इलेक्ट्रॉनिक माध्यम) या पुरस्काराने गौरविण्यात आले.
परुळेकर म्हणाले, ‘देश म्हणून, समाज म्हणून आपण एक आहोत. एकमेकांना सोडून जगायचा विचार केला, तरी आपण कोसळून पडू. संविधानाची निर्मिती करणाऱ्या आपल्या पूर्वजांना हे माहीत होते. त्यामुळेच त्यांनी भारताचा हिंदू पाकिस्तान होऊ दिला नाही. विविधता, वेगवेगळे विचार एकत्र घेऊन गेल्यामुळेच आपण प्रगती केली. आजच्या काळात सगळ्या समाजघटकांना सोबत घेऊन पुढे जायला हवे. भारताचा हिंदू पाकिस्तान होऊ नये ही आपली जबाबदारी आहे. पत्रकार, कवी, लेखकांनीही त्यासाठी प्रयत्न करायला हवेत.’
डॉ. शैलेश गुजर आणि सूर्यकांत पाठक यांनी पुरस्कार विजेत्यांची ओळख करून दिली. उल्हास पवार यांनी प्रास्ताविक केले. मुकुंद संगोराम यांनी निवड समितीच्या वतीने मनोगत व्यक्त केले. अंकुश काकडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश भोंडे यांनी आभार मानले.
दहशतवाद्यांनी देशावर भ्याड हल्ला केला. त्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. सरकारबरोबर ठाम उभे राहण्याचा काळ आहे. केंद्र सरकार सक्षम आहे. कठोर पावले उचलली जातील, अशी अपेक्षा आहे. पाकिस्तानला धडा शिकवायला हवा. दहशतवाद्यांना अद्दल घडायला हवी. त्यासाठी कठोरात कठोर शासन करायला हवे. मात्र, या हल्ल्यानंतर समाज माध्यमांवरून सामाजिक सलोखा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यातून केवळ दहशतवाद्यांचा हेतू साध्य होत आहे. – अमोल कोल्हे, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)