लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: भूगर्भातील तेल आणि वायूचे साठे शोधण्यासाठी ‘रिव्हर्स टाइम मायग्रेशन’ (आरटीएम) प्रणाली प्रगत संगणन विकास केंद्राने (सी-डॅक) विकसित केली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून विदा विश्लेषण करून तेल-वायू कंपन्यांना साठे शोधणे शक्य होणार असून, सध्या वापरल्या जाणाऱ्या परदेशी प्रणालीच्या तुलनेत सी-डॅकने विकसित केलेली प्रणाली किफायतशीर ठरणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
सी-डॅकचे महासंचालक ई. मगेश यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. प्रणाली विकसित करणाऱ्या सिस्मिक मॉडेलिंग विभागाच्या सहसंचालक रिचा रस्तोगी, सल्लागार सुहास फडके या वेळी उपस्थित होते. ऊर्जानिर्मिती आणि दळणवळणासाठी महत्त्वाचा घटक ठरणाऱ्या तेल-वायूचे साठे शोधण्यासाठी कंपन्यांकडून जमिनीवर किंवा समुद्रात भूकंपीय सर्वेक्षण केले जाते. त्यानंतर हाती आलेल्या विदाचे विश्लेषण करून हायड्रोकार्बन खोदकामासाठीचे स्थान निश्चित केले जाते. या प्रक्रियेसाठी सध्या परदेशी बनावटीची प्रणाली वापरली जाते. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात. यावर उपाय म्हणून सी-डॅकने ‘नॅशनल सुपर कम्प्युटिंग मिशन’अंतर्गत स्वदेशी बनावटीची प्रणाली विकसित केली आहे. त्यासाठी ओनजीसी आणि आयआयटी, रुरकी यांचे सहकार्य मिळाले आहे. या प्रणालीद्वारे सध्या केल्या जाणाऱ्या खर्चाच्या तुलनेत कमी खर्चात तेल कंपन्यांना सेवा उपलब्ध होईल, असे मगेश यांनी सांगितले.
आणखी वाचा- पुणे शहर आणि परिसरात पावसाची हजेरी
रस्तोगी म्हणाल्या, की रिव्हर्स टाइम मायग्रेशन (आरटीएम) प्रणाली विकसित करण्यासाठी गेली चार वर्षे काम सुरू होते. उपलब्ध असलेला विदा, ओएनजीसीने दिलेला विदा वापरून या प्रणालीची चाचणी घेण्यात आली, वैधता तपासण्यात आली. साधारणपणे पुढील वर्षी ही प्रणाली खुली करण्यात येईल. सध्या उपलब्ध असलेल्या परदेशी प्रणालींमध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्याची सुविधा नाही, तर आरटीएम प्रणालीमध्ये आवश्यकतेनुसार बदल करणे, अद्ययावतीकरण करणे शक्य आहे.
कार्यशाळेचे आयोजन
सी-डॅकतर्फे शुक्रवारी (२८ एप्रिल) एचपीसी इन सिस्मिक इमेजिंग : सीईंग बिलो दर अर्थ्स सरफेस या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत सिस्मिक इमेजिंग या विषयावर चर्चा करण्यात येईल. या कार्यशाळेत तेल उद्योग, संशोधन संस्था, शैक्षणिक संस्थांतील तज्ज्ञांचा सहभाग आहे.