पुणे : इंडिगो या प्रवासी विमान कंपनीने पुणे आणि भोपाळ ही थेट विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. या नवीन मार्गामुळे पर्यटनाबरोबरच या दोन शहरांमधील व्यापारालाही देखील प्रोत्साहन मिळेल. ही सेवा २७ ऑक्टोबरपासून दररोज सुरू होईल. याचबरोबर कंपनी पुण्याहून इंदोर, चेन्नई आणि रायपूर या मार्गावरही इंडिगो दिवाळीच्या आधी विमानसेवा सुरू करणार आहे.
विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे पुणे हे महाराष्ट्रातील महत्वाचे शहर आहे. येथील शैक्षणिक संस्था आणि सांस्कृतिक वारसा ही पुण्याची ओळख आहे. परंपरा आणि आधुनिकता या दोन्हीचा मिलाफ घडवणाऱ्या पुण्यात सुंदर उद्याने, ऐतिहासिक वास्तू तसेच खाद्य-रसिकांसाठी अनेक पर्याय आहेत. पुणे हे माहिती तंत्रज्ञान (आयटी) केंद्र आहे. त्यामुळे देशभरातून तरुण नोकरीसाठी येथे येतात. देशातील वाहननिर्मिती उद्योगाचे पुणे एक मुख्य केंद्र आहे. अनेक आघाडीच्या वाहन निर्मिती कंपन्या आणि त्याच्याशी संबंधित उद्योग येथे आहेत.
हेही वाचा >>>बोपदेव घाट सामुहिक बलात्कार प्रकरणात तीन हजार मोबाइल क्रमांकाची तपासणी २०० हून जास्त सराइतांची चौकशी
भोपाळ ही मध्य प्रदेशची राजधानी असून इतिहास आणि नैसर्गिक सौंदर्य यांचा अनोखा संगम तेथे झालेला दिसतो. ‘तलावांचे शहर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भोपाळमध्ये अनेक सुंदर तलाव आणि उद्याने आहेत. सांस्कृतिक वैविध्याच्या बाबतीत भोपाळ समृद्ध आहे. येथे ताज-उल्-मस्जिद आणि भारत भवन सारखे अप्रतिम वास्तूकलेचे नमुने बघायला मिळतात. त्यामुळे इतिहास आणि वास्तूकलेमध्ये स्वारस्य असणाऱ्यांसाठी भोपाळ एक आवडते डेस्टिनेशन आहे.
याबाबत इंडिगोचे जागतिक विक्रीप्रमुख विनय मल्होत्रा म्हणाले की, भोपाळ आणि पुणे या शहरांमध्ये २७ ऑक्टोबरपासून दररोज थेट उड्डाणे सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे. ही नवीन उड्डाणे दोन राज्यांना जोडण्याचे महत्त्वाचे काम करतील. आम्ही नवनवीन मार्गांवर उड्डाणे सुरू करण्यास कटिबद्ध आहोत. ग्राहकांना http://www.goIndiGo.in या आमच्या अधिकृत संकेतस्थळावरून तिकिटांचे आरक्षण करता येईल.
हेही वाचा >>>पिंपरी : महापालिकेची ‘पीपीपी’ तत्त्वातून फुगेवाडीत पहिली इंग्रजी माध्यमाची शाळा
पुणे-भोपाळ दैनंदिन विमानसेवा
पुण्याहून उड्डाण – दुपारी १ वाजता
भोपाळमध्ये आगमन – दुपारी २:३५ वाजता
भोपाळमधून उड्डाण – दुपारी ३:०५ वाजता
पुण्यात आमगम – दुपारी ४: ५० वाजता