IndiGo Passengers stranded at Pune airport : दुबईहून पुण्याला जाणाऱ्या शेकडो प्रवाशांना बुधवारी रात्री मनस्तापाला सामोरे जावे लागल्याचा प्रकार समोर आला आहे. आपले सामान परत मिळवण्यासाठी दोन तास ताटकळत बसावे लागले आणि या काळात विमान कंपनी किंवा विमानतळ प्रशासनाने आपली कुठलीही मदत न केल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. दरम्यान विमानतळावरील बॅगेज स्क्रीनिंग मशीनमध्ये बिघाड झाल्याने हा उशीर झाल्याचे विमानतळ प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
इंडिगोचे विमान 6E 1484 हे दुबईहून संध्याकाळी ५ वाजून ४० मिनिटांनी निघाले आणि रात्री १० वाजून १० मिनिटांनी पुण्यात उतरणार होते, मात्र ते रात्री ९ वाजून ४० मिनिटांनी पुण्यात पोहचले. पण प्रवाशांना त्यांचे सामान मिळायला उशीर झाल्यामुळे लवकर येण्याचा काही उपयोग झाला नाही आणि प्रवासी चांगलेच वैतागले.
प्रवाशांनी व्यक्त केली नाराजी
आपल्या कुटुंबियांबरोबर प्रवास करत असलेले निवृत्त एसपी भानुप्रताप बरगे यांनी या संपूर्ण प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली. “नियोजित वेळेच्या आधी विमान ९ वाजून ४० मिनिटांनी पोहचल्याने आम्ही खुष झालो होतो, पण सामान यायला ११ वाजून १५ मिनिटांनी सुरूवात झाली”, असे ते म्हणाले.
“स्क्रीनवर कोणतीही माहिती न मिळाल्याने अनेक प्रवाशांना अडकून पडावे लागले, त्यांना कोणताही संदेश किंवा कसलीही मदत मिळाली नाही.आम्ही आमचे सामान ताब्यात घेल्यानंतरही, टर्मिनल २ वरील पिकअप पॉईंटवर आम्हाला एका कॅब घ्यायला येण्यासाठी २० मिनिटे लागली”, असेही त्यांना सांगितले. बरगे यांनी विमानतळावर सुरक्षा कर्मचारी, पोलीस आणि पिकअप झोन मॅनेजमेटची कमतरता होती, ज्यामुळे विमानतळाबाहेर प्रचंड गर्दी झाल्याचा मुद्दा देखील उपस्थित केला.
औंध विकास मंडळाचे सदस्य गिरीष देशपांडे यांनी सांगितलं की, त्यांच्या पत्नीला एअरलाइन आणि विमानतळ प्रशासनाच्या बैजबाबदार वर्तनाचा सामना करावा लागला. त्यांच्या पत्नी या दुबई येथे आपल्या मुलांना भेटून भारतात परतत होत्या. “विमान नियोजित वेळेपेक्षा लवकर पोहोचले तरी, सामानासाठी वाट पाहावी लागणे हास्यास्पद होते. पहिल्यांदा एरोब्रिज डॉक करण्यासाठी १५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागला आणि नंतर रात्री ११ नंतरच सामान कन्व्हेयर बेल्टवर दिसू लागले. रात्री ११ वाजून १० मिनिटांनी आम्हाला आमच्या बॅगा मिळाल्या, पण काही प्रवाशांनी त्यांच्या बॅगा मिळण्यासाठी जवळपास दोन तास वाट पाहिली”, असे देशपांडे म्हणाले. विमानतळाबाहेर झालेल्या वाहतूक कोंडीचाही त्यांनी उल्लेख केला.
दरम्यान बॅगेज स्क्रीनिंग मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे हा उशीर झाल्याची माहिती इंडिगो टीमकडून देण्यात आली. प्रवाशांना आलेल्या अडचणीबाबात पुणे विमानतळ संचालक संतोष ढोके यांना प्रश्न विचारण्यात आला असता, त्यांना याबद्दल कल्पना नसल्याचे त्यंनी सांगितले. तसेच ते म्हणाले की, “कस्टम विभागाने तपासणीसाठी लगेज कलेक्शन बंद केले असावे किंवा याला एअरलाइन्सच्या कर्मचारी जबाबदार असू शकतात”.