लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या आळंदीत इंद्रायणी नदी पुन्हा एकदा जलप्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच पुन्हा एकदा इंद्रायणी नदी फेसाळली आहे. नदीमध्ये रसायनयुक्त पाणी सोडलं गेल्याने हे प्रदूषण होत असल्याचा आरोप आळंदीकरांनी केला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये इंद्रायणी नदीमध्ये वारंवार रसयानुक्त फेस येत असल्याचं दिसून येत आहेत. यासंबंधी प्रशासन देखील गंभीर नसल्याचे चित्र अधोरेखित होत आहे.
हेही वाचा… आईला भेटायला आला अन् पोलिसांच्या जाळ्यात सापडला…
येत्या नऊ डिसेंबरला आळंदीमध्ये कार्तिकी वारी सोहळा होणार आहे. तर अकरा डिसेंबरला ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी आळंदीमध्ये दाखल होतात. या वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या इंद्रायणी नदीच्या प्रदूषणामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. इंद्रायणी नदीतील प्रदूषणामुळे वारकरी आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. वारकऱ्यांच्या आणि आळंदीकरांच्या आरोग्याशी खेळ- खेळला जातो की काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. इंद्रायणी नदीच्या प्रदूषणावर प्रशासन देखील ठोस पावलं उचलत नसल्याचं बघायला मिळत आहे. इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त व्हावी यासाठी प्रशासनाने योग्य ते निर्णय घेणे गरजेचे आहेत.