आळंदी : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काही वेळातच आळंदीमध्ये दाखल होणार आहेत. त्याआधी इंद्रायणी नदी फेसाळल्याचे चित्र आहे. महायुती सरकारने इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करण्याच आश्वासन दिलं होतं. तसं माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शब्द दिला होता. परंतु, त्यानंतरही इंद्रायणी नदी प्रदूषित होत असल्याचं वारंवार चित्र समोर आलेलं आहे.
इंद्रायणी नदी पुन्हा एकदा फेसाळली आहे. गेल्या आठवड्यामध्येच इंद्रायणी नदी फेसाळल्याचे चित्र पाहायला मिळालं होतं. आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आळंदी दौऱ्यावर आहेत. त्याआधीच इंद्रायणी नदी फेसाळल्याने इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. महायुतीचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आळंदीमध्येच एका कार्यक्रमादरम्यान इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करण्याचा शब्द दिला होता, तसं जाहीररित्या आश्वासन दिलं होतं. परंतु, हे आश्वासन हवेत विरलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनानंतरही काही हालचालींना वेग आलेला नाही.
आणखी वाचा-…तर मुळशीतून पाणी द्या; आयुक्तांची भूमिका
इंद्रायणी नदीच्या आजूबाजूच्या कंपन्यांमधून आजही रासायनिक आणि प्रक्रिया न केलेलं पाणी थेट इंद्रायणी नदीमध्ये सोडलं जात आहे. यावर कारवाई करून संबंधित कंपनींना दंड आकारणे गरजेचा आहे. त्यांच्यावर कडक कारवाई होणं अत्यावश्यक आहे. असं वारंवार आळंदीतील नागरिकांनी मागणी केलेली आहे. तरीही महायुतीच्या सरकारनं याकडे लक्ष दिलं नाही यामुळे वारकऱ्यांमध्ये काही प्रमाणात नाराजी आहे. यावर आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही बोलणार का? याकडे वारकऱ्यांचं लक्ष लागलं आहे.