पुणे : पुण्याच्या आळंदीमधील इंद्रायणी नदीमध्ये पुन्हा एकदा केमिकलयुक्त पाणी सोडल्याने नदी प्रदूषित झाली आहे. इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त म्हणून मोकळा श्वास कधी घेणार, असा प्रश्न यामुळे वारंवार उपस्थित होत आहे. बर्फाळ प्रदेशातील नदीप्रमाणे इंद्रायणी नदीचे स्वरूप झालेल आहे. फेसयुक्त पाण्याने अवघे नदीपात्र झाकलेल आहे. लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान म्हणून आळंदीकडे बघितलं जातं. पवित्र स्नान याच प्रदूषित झालेल्या इंद्रायणी नदीत वारकरी करतात.
हेही वाचा – ढगांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस; मध्यवर्ती भागासह उपनगरात ऐन दिवाळीत तारांबळ
इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त व्हावी म्हणून आळंदीमधील वारकऱ्यांनी अनेकदा उपोषणे, आंदोलने केलीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील काही महिन्यांपूर्वी आळंदीमध्ये येऊन इंद्रायणी नदी ही प्रदूषणमुक्त करणार असल्याचे आश्वासन दिल होते. ते आश्वासन हवेत विरल्याचं आणि त्या आश्वासनाचा विसर पडल्याचा आरोप आता आळंदीमधील वारकरी करत आहेत. इंद्रायणी नदीची ही दुर्दशा पाहावत नाही. शासनाने याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावं आणि इंद्रायणी प्रदूषणमुक्त करावी, अशी मागणी वारकरी करत आहेत.