पुणे : ‘माझे बालपण मुंबईत गेले. माझे काही शिक्षण गुजराती, तर काही शिक्षण हिंदी, इंग्रजी आणि मराठी माध्यमात झाले. त्यामुळे मी या चारही भाषा अस्खलितपणे बोलू लागलो. या चारही भाषांमध्ये शिकल्यानंतर मराठी माध्यमातून जे शिकायला मिळाले, ते कोणत्याच माध्यमाच्या शाळांमध्ये मिळाले नाही, हे मला जाणवले,’ अशी भावना ‘फोर्स मोटार’चे अध्यक्ष उद्योगपती डॉ. अभय फिरोदिया यांनी गुरुवारी व्यक्त केली.
जनसेवा फाउंडेशन पुणेतर्फे ‘भेटूया एका दिग्गजाला’ या उपक्रमांतर्गत फोर्स मोटारचे अध्यक्ष उद्योगपती डॉ. अभय फिरोदिया यांचा सन्मान आणि प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी डॉ. अभय फिरोदिया यांच्याशी उद्योगपती प्रताप पवार यांनी संवाद साधला. या कार्यक्रमाला ‘देसाई ब्रदर्स उद्योग समूहा’चे प्रमुख नितीन देसाई, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, जनसेवा फाउंडेशन पुणेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विनोद शहा, जनसेवा फाउंडेशनचे खजिनदार राजेश शहा, जनसेवा फाउंडेशनचे विश्वस्त नितीन कोठारी, विकफिल्ड उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक मुकेश मल्होत्रा आणि अश्विनी मल्होत्रा आदी उपस्थित होते. या वेळी डॉ. अभय फिरोदिया आणि इंदिरा अभय फिरोदिया यांचा सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी डॉ. फिरोदिया म्हणाले, ‘मी स्वतःला खूप भाग्यशाली समजतो, की मला आजोबा कुंदनमल फिरोदिया आणि वडील नवलमल फिरोदिया या दोघांचे संस्कार आणि मूल्यांची रुजवण करणारी शिकवण लाभली. एकदा वडील आजारी असताना मी त्यांना असे विचारले की, तुम्ही इंजिन विकसित केले आणि दूरदृष्टी ठेवून फोर्सचे साम्राज्य उभे केले. कालांतराने तुम्ही दानधर्म केला, तर या दोन्हीपैकी तुम्हाला सगळ्यात जास्त काय भावले. त्यावर वडिलांनी दानधर्मात आत्मिक समाधान लाभले,’ असे उत्तर मला दिले.
‘आजोबा आणि वडील यांचा नेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्वाचा अंश माझ्यात उतरला आहे. १९६७ च्या काळात भारतात उद्योग-व्यवसायांना अनेक बंधने आणि जटील अटी-शर्थींना सामोरे जावे लागत होते. सरकारचे सर्व कडक नियम आणि अटी पाळून त्या काळात वडिलांनी इंजिन विकसित करून ते यशस्वी करून दाखवले,’ असेही त्यांनी नमूद केले.