पिंपरी : इतकी वाताहत झाल्यानंतरही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या विळख्यातच अडकलेले आहेत, अशी टीका राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली.‘पूर्वीची शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या कचाट्यात सापडलेली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगत होते, की काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याची वेळ आल्यास शिवसेनेचे दुकान बंद करीन. काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत न जाण्याची बाळासाहेबांची भूमिकाच आम्ही कायम ठेवली आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ अभियानाच्या निमित्ताने पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांची भूमिका काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याचीच आहे, असे स्पष्टपणे दिसून येत आहे. दोन्ही काँग्रेसच्या विळख्यातच उद्धव ठाकरे यांची शिवसेना पूर्णपणे अडकलेली आहे,’ असे सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
‘राज्यातील सरकार पडणार, मध्यावधी निवडणुका होणार. राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होईल, अशा विविध प्रकारच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहेत. प्रत्यक्षात या चर्चेला काहीच अर्थ नाही. सरकारकडे १७० आमदारांचे पाठबळ आहे. आणखी १२ आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात आहे. त्या आमदारांना रोखून धरण्यासाठी अशाप्रकारे वल्गना केल्या जात आहेत,’ असे सामंत म्हणाले.
हेही वाचा : पुणे महापालिकेत लवकरच २०० पदांची भरती; आयुक्तांची माहिती
‘हर हर महादेव’ चित्रपट मी पाहिला आहे. त्यात दाखवण्यात आलेले काही संदर्भ मलाही समजलेले नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी चित्रपट, नाटक तयार करत असताना निर्माते, लेखक-दिग्दर्शकांनी वास्तव आहे तेच दाखवले पाहिजे. हीच भूमिका छत्रपती संभाजीराजे यांनी मांडली आहे, असे सामंत यांनी सांगितले.
अब्दुल सत्तार यांचे वक्तव्य चुकीचे
राजकारणात आरोप-प्रत्यारोप होतच असतात. मात्र, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी केलेले वक्तव्य चुकीचे आहे. महाराष्ट्राला एक संस्कृती, परंपरा आहे, त्याचा आदर प्रत्येकाने केला पाहिजे, असे मत उदय सामंत यांनी व्यक्त केले.