पुणे : ‘युरोप, अमेरिकेत उद्योग आणि शिक्षण क्षेत्राचा मोठा विकास झाला आहे. त्याचे कारण म्हणजे हे दोन्ही क्षेत्रे तेथे एकमेकांच्या हातात हात घालून एकत्र वाटचाल करतात. त्यामुळे देशात उद्योग आणि शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणायची झाल्यास या दोन्ही क्षेत्रांनी एकत्र वाटचाल करण्याची गरज आहे,’ असे मत पीतांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांनी शनिवारी व्यक्त केले.
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या ४२व्या पदवीप्रदान समारंभात प्रभुदेसाई यांच्यासह ज्येष्ठ अभिनेते, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे आणि कायनेटिक ग्रीन एनर्जी व पॉवर सोल्युशन्सच्या संस्थापक अध्यक्षा सुलज्जा फिरोदिया-मोटवानी यांना विद्यानिधी (डी. लिट.) पदवीने सन्मानित करण्यात आले. त्या वेळी प्रभुदेसाई बोलत होते.विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक, कुलगुरू डॉ. गीताली टिळक, उपाध्यक्ष डॉ. रोहित टिळक, विश्वस्त प्रणती टिळक, सरिता साठे, कुलसचिव डॉ. सुवर्णा साठे उपस्थित होत्या. विद्यापीठाच्या पदवी-पदविका प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.
प्रभुदेसाई म्हणाले, ‘हे स्पर्धेचे युग आहे. त्यामुळे उत्पादनाचा विकास ही काळाची गरज आहे. उद्योजक नेहमी मेहनत करत असतात. वर्षानुवर्षे काम करत असतात. मात्र, समाज त्यांच्याकडे ऑल टाइम मनी मशिन अशा नजरेने पाहतो. उद्योजकही सामाजिक जबाबदारीचे भान राखणारे नागरिक असतात.‘वैचारिक मेंदू वाढल्यानंतर आपले शिक्षण केवळ बुद्धिनिष्ठ झाले आहे. बुद्धीप्रमाणेच संवेदनशील मनही महत्त्वाचे असते. मात्र, शिक्षण व्यवस्था केवळ बुद्धिनिष्ठ झाली आहे. आजच्या तरुणांना भावनांचे शिक्षण देण्याची गरज निर्माण झालेली दिसते. लहानपणापासूनच भावनिक शिक्षणही द्यायला हवे. संवेदनांचा, भावनांचा विकास होणे महत्त्वाचे आहे,’ असे मत डॉ. आगाशे यांनी व्यक्त केले.