परदेशी उद्योगांसाठी पायघडय़ा अंथरणाऱ्या पण, देशातील उद्योगांबाबत उदासीन असणाऱ्या सरकारी धोरणांमुळे देशाचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. देशाच्या सर्वागीण विकासासाठी छत्रपती शिवाजीमहाराज आणि पहिले बाजीराव पेशवे यांच्या धोरणांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ उद्योजक अरुण फिरोदिया यांनी व्यक्त केले.
कॉन्टिनेन्टल प्रकाशनतर्फे (कै.) निनाद बेडेकर, शिवप्रसाद मंत्री आणि डॉ. सुनील डोके यांनी लिहिलेल्या ‘छत्रपती शिवाजीमहाराज आणि पहिले बाजीराव पेशवे यांची कालातीत व्यवस्थापन तत्त्वे’ या पुस्तकाचे प्रकाशन फिरोदिया यांच्या हस्ते झाले. इतिहासाचे अभ्यासक पांडुरंग बलकवडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
फिरोदिया म्हणाले, शिवाजीमहाराजांनी प्रत्यक्षात आणलेली व्यवस्थापन तत्त्वे पहिल्या बाजीराव पेशव्यांनी अमलात आणल्यामुळे मराठेशाही पुनरुज्जीवित झाली. वेग आणि जलद संवाद ही या दोघांच्याही कार्यप्रणालीची वैशिष्टय़े होती. याच धोरणांच्या आधारे सध्याच्या काळातील सीसीडी आणि कॅबसेवा कार्यरत आहेत. या धोरणांची अंमलबजावणी केल्यास कोणत्याही क्षेत्रातील उद्योजकास हमखास यश मिळेल इतकी ही धोरणे कालसुसंगत आहेत. जागतिकीकरणाची सुरुवात शिवरायांच्या काळातच झाली. किल्ल्यांची बांधणी, बोटी आणि आरमारे उभारणे ही कामे त्यांनी पैसे देऊन करून घेतली. पण, हे करताना त्यांनी आपले सत्त्व राखले. शिवराय आणि बाजीराव या दोघांनीही सर्वधर्मसमभावाला महत्त्व दिले. ब्रिटिशांनी जातपात आणि धर्माच्या फुटीरतेची बीजे पेरली आणि आपण त्याला बळी पडलो.
बलकवडे म्हणाले, नोकरीच्या मागे लागून सुरक्षित आणि संकुचित जीवन जगू पाहणाऱ्या मराठी माणसांनी शिवाजीमहाराज आणि बाजीराव पेशवे यांची तत्त्वे अमलात आणून उद्योग-व्यवसायात उडी घेतली पाहिजे. हजारो मैल घोडदौड करणाऱ्या शिवरायांनी निर्माण केलेले साम्राज्य थक्क करणारे आहे. शत्रूंच्या हालचालींचा वेध घेत व्यूहरचना आखणे हे या दोघांचेही कौशल्य होते. आलेल्या संधीचे सोने करण्याची त्यांची हातोटी नव्या पिढीने आत्मसात करावी. युवा पिढीला पाश्चात्त्यांऐवजी आपल्या मातीतील राज्यकर्त्यांचा इतिहास शिकविला पाहिजे.
शिवप्रसाद मंत्री यांनी मनोगत व्यक्त केले. देवयानी कुलकर्णी-अभ्यंकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सुनील डोके यांनी आभार मानले.

Story img Loader