लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : महापालिका आणि स्थानिक उद्योजकांमध्ये संवाद वाढावा, उद्योगांना भेडसावणाऱ्या समस्यांचे तत्काळ निराकरण व्हावे, तसेच औद्योगिक आणि आर्थिक गुंतवणुकीला चालना मिळावी, यासाठी महापालिकेने ‘उद्योग सुविधा कक्ष’ स्थापन केला आहे.
औद्योगिक गुंतवणुकीस अनुकूल वातावरण निर्माण करणे, व्यापारी, उद्योजक व कामगार संघटनांशी संवाद साधून स्थानिक पातळीवरील अडचणी समजून घेणे व त्याचे निराकरण करणे, गुंतवणूकदार-उद्योजकांना प्रशासनाशी समन्वय साधून आवश्यक कायदेशीर व प्रशासकीय सहकार्य या कक्षाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
एक खिडकी योजना, उद्योग-सारथी संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. व्यापारी, उद्योग संघटनांसाठी तक्रार निवारण संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आले आहे. याद्वारे उद्योग-धंदा परवाना, तसेच इतर स्थानिक सुविधा व सेवांबाबतच्या तक्रार नोंदविता येईल. उद्योगांकडून सूचना मागविण्यात येणार आहेत.
उद्योग प्रतिनिधी आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांमध्ये मासिक बैठकांचे आयोजन करून स्थानिक समस्यांवर चर्चा व त्यांचे निराकरण केले जाणार आहे. आयुक्त स्तरावर त्रैमासिक बैठकांचे आयोजन केले जाणार आहे. त्यात एमआयडीसी, पोलीस प्रशासन आणि राज्य शासनाशी समन्वय साधून आवश्यकतेनुसार धोरणात्मक चर्चा केली जाणार आहे.
उद्योग क्षेत्रातील गुंतवणूकदार उद्योजकांसाठी पोलीस प्रशासनाबरोबर आवश्यक समन्वय आणि त्रैमासिक बैठकांचे आयोजन केले जाणार आहे. व्यवसायसुलभता वाढवण्यासाठी नियमांचे पालन आणि गुंतवणुकीस सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महापालिकेच्या सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांमध्ये (सीएसआर) उद्योगांचा सहभाग वाढवण्यासाठी विशेष उपक्रम, मध्यम व लघुउद्योगांसाठी महापालिकेचे ऑटो क्लस्टर व इतर औद्योगिक संस्थांसोबत समन्वय साधून तांत्रिक व व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. कामगार आणि उद्योजकांसाठी शासकीय कल्याणकारी योजना, आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक विकास या संदर्भात माहिती व सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत.
स्थानिक गुंतवणुकीला चालना
महापालिकेच्या ‘उद्योग सुविधा कक्षा’मुळे स्थानिक गुंतवणूक आणि औद्योगिक विकासाला वेग मिळेल, व्यवसाय सुलभ होईल आणि उद्योजकांसाठी आवश्यक धोरणात्मक पाठबळ व सुविधा उपलब्ध होतील. या कक्षाचे कामकाज आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीळकंठ पोमण यांच्या नियंत्रणाखाली चालणार आहे. सामाजिक उत्तरदायित्वचे मुख्य सल्लागार विजय वावरे हे कक्षाच्या संचालनाचे काम पाहणार आहेत.
‘उद्योग सुविधा कक्ष’ हा स्थानिक उद्योग व प्रशासन यांच्यातील महत्त्वाचा दुवा ठरेल. या उपक्रमामुळे गुंतवणूकदारांना पारदर्शक व वेगवान सेवा मिळेल आणि व्यवसाय सुलभतेला चालना मिळेल. महापालिकेच्या विविध विभागांशी समन्वय साधून औद्योगिक अडचणी सोडवण्यासाठी हा कक्ष प्रभावी भूमिका बजावेल, असे आयुक्त शेखर सिंह म्हणाले.