पिंपरी-चिंचवड शहर हद्दीत एमआयडीसीच्या जागेत बांधण्यात आलेल्या झोपडय़ांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी चिंचवड येथे बोलताना स्पष्ट केले. तथापि, अधिकृत झोपडय़ांना संरक्षण देण्यात येईल, असेही ते म्हणाले. एमआयडीसीच्या जागेवर झालेले अतिक्रमण तातडीने काढून टाकण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एमआयडीसीच्या विविध प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी देसाई यांच्या उपस्थितीत चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे बैठक झाली. खासदार शिवाजीराव आढळराव, श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार, शिवसेनेच्या गटनेत्या सुलभा उबाळे, महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे, एमआयडीसीचे  अजित देशमुख आदी उपस्थित होते.

एमआयडीसीच्या वतीने शहरातील ५३ भूखंड महापालिकेला देण्यात आले होते. त्यापैकी तीन परत घेण्यात आले. तर, ४० भूखंड विविध कामांसाठी वापरण्यात आले. मात्र, दहा भूखंड अस आहेत, त्याचा कोणत्याही प्रकारे वापर करण्यात आला नाही. अशांना संरक्षित भिंती बांधून एमआयडीसी आणि महापालिकेच्या वतीने संयुक्तपणे वृक्षारोपण करावे. एमआयडीसीच्या ज्या मोकळ्या भूखंडांवर अतिक्रमण झाले आहेत, ते तातडीने काढून टाकण्याचे आदेश देसाई यांनी या वेळी दिले. चिंचवडच्या संभाजीनगर येथील उद्यानात झालेले बेकायदेशीर बांधकाम तातडीने काढून टाकण्याचे आदेशही त्यांनी या वेळी दिले. यासंदर्भात, जागा अदलाबदलीचा प्रस्ताव दिल्याचे उत्तर पालिका अधिकाऱ्यांनी दिले असता, मंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नियमानुसार असे करता येणार नाही, असे त्यांनी निक्षून सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Industry minister orders immediate removal of encroachments on midc plot