लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : शेतकरी स्वत:साठी अन्नधान्य पिकवत नाही, तर तो समाजासाठी शेती करतो. त्याप्रमाणे उद्योगजगाने व्यापक दृष्टिकोन ठेवून समाजाच्या भल्याचा विचार करावा. समाजाच्या भरभराटीतच वैयक्तिक भरभराट दडलेली असते, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. भारतीय अर्थव्यवस्थेमागील तत्वज्ञान अन्य देशांपेक्षा वेगळे आहे. औद्योगिकीकरण, शाश्वत ऊर्जेचा वापर आणि उद्योगात मानवी दृष्टिकोन ठेवावा, असे आवाहनही डॉ. भागवत यांनी केले.

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चर (एमसीसीसीआय) पुणे या संस्थेच्या वतीने आयोजित ‘भारतीय अर्थविषय धोरणांविषयीचे तत्वज्ञान’ या विषयावर डॉ. भागवत बोलत होते. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष दीपक करंदीकर, महासंचालक प्रशांत गिरबने यावेळी उपस्थित होते. उद्योग आणि अर्थव्यवस्थेच्या अनेक बाबींवर भागवत यांनी भूमिका मांडली. या कार्यक्रमाला ३०० हून अधिक उद्योजक उपस्थित होते.

आणखी वाचा-पुणे महापालिकेचा अजब कारभार; ठेकेदाराबरोबर करार न करताच ८२ ठिकाणी चार्जिंग स्थानके

डॉ. भागवत म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्था, उद्योग सगळ्यांच्या फायद्याासठी करावा, या तत्वावर आधारित आहे. उद्योगपतींनी आपण उद्योगाचे मालक नाही तर विश्वस्त आहोत, हा विचार कायम मनात ठेवावा. भारतीय अर्थव्यवस्थेमागील तत्वज्ञान अन्य देशांपेक्षा वेगळे आहे. इतिहासकालीन दाखल्यातूनही ही बाब स्पष्ट झाली आहे. भारतीय उद्योगाचा पाया समाजाचा फायदा बघण्यासाठी आहे. औद्योगिकीकरण, शाश्वत ऊर्जेचा वापर आणि उद्योगात मानवी दृष्टिकोन बाळगणे आवश्यक आहे.

पैशाच्या संपत्तीपेक्षा बुद्धीची संपत्ती महत्त्वाची आहे, हा भारतीय संस्कृतीमधील विचारही विसरता कामा नये. त्यानुसार स्वत:च्या उपभोगासाठी, भविष्याची तरतूद, धार्मिक कार्यांसाठी, समाजासाठी, राज्यकर्त्यांसाठी आणि निकडीच्या प्रसंगी संपत्तीचे समान भाग करावे, अशी सूचना भागवत यांनी केली. दीपक करंदीकर यांनी भागवत यांचे स्वागत केले तर, प्रशांत गिरबने यांनी उपस्थितांचे आभार मानले.