उद्योगांसह वाहनांमुळे होणारे प्रदूषण त्यातच बांधकाम प्रकल्पाची भर यामुळे श्वास घेण्यासाठी स्वच्छ हवा मिळेना. अखेर हजारो नागरिकांना रस्त्यावर उतरून स्वच्छ हवेची मागणी करावी लागली. राज्याच्या नुकत्याच जाहीर झालेल्या आर्थिक पाहणी अहवालातही पुण्यातील या गंभीर समस्येवर बोट ठेवण्यात आले आहे.

राज्यातील औद्योगिक गुंतवणुकीचे प्रमुख केंद्र म्हणून पुण्याकडे पाहिले जाते. पुणे जिल्ह्याचा विचार करता ग्रामीण भागासह पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांमध्ये नागरीकरणाचा वेग प्रचंड आहे. शहरांच्या सीमा विस्तारत असताना त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्याही प्रकर्षाने समोर येत आहेत. पुण्यातील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्यामुळे लोकसंख्येपेक्षा वाहनांची संख्या अधिक झाली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात पुण्यातील प्रदूषणकारी उद्योगांची यादी देण्यात आली आहे. पुण्यात एकूण २३ हजार २१८ उद्योग आहेत. त्यापैकी ४ हजार ८४१ उद्योग हे जास्त प्रदूषण गटातील आहेत. याचवेळी मध्यम प्रदूषण गटात ९ हजार २६५ उद्योग आहे. कमी प्रदूषण करणाऱ्या गटात १० हजार ८१८ उद्योग आहेत. त्यामुळे पुण्यातील एकूण उद्योगांपैकी निम्म्याहून अधिक उद्योग हे जास्त आणि मध्यम प्रदूषण करणाऱ्या गटातील असल्याचे समोर आले आहे.

पुण्यातील हवा गुणवत्ता निर्देशांक सातत्याने ढासळत आहे. याला औद्योगिक आणि वाहनांच्या प्रदूषणासोबत वाढते बांधकाम हा घटकही तेवढाच कारणीभूत ठरत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ठिकठिकाणी बांधकामे सुरू आहेत. या बांधकामामुळे निर्माण होणाऱ्या धुळीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. बांधकामांना काँक्रिटचा पुरवठा करणारे शेकडो रेडी मिक्स काँक्रिट प्रकल्प शहरात आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. वाकड परिसरातील अशा प्रकल्पांमुळे प्रदूषण वाढल्याने त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागले. त्यात बहुतांश हे माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी होते. हे आंदोलन झाले त्या वाकडमधील भूमकर नगरमध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक बुधवारी सायंकाळी २६५ नोंदविण्यात आला. ही हवेची खराब पातळी असून, या हवेमुळे श्वसनास त्रास होण्याची समस्या निर्माण होऊ शकते.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने काही रेडी मिक्स काँक्रिट प्रकल्प बंद करण्याचे पाऊल उचलले आहे. मात्र, त्यामुळे परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. पुणे महापालिकेचा विचार करता सुमारे २०० बांधकाम प्रकल्पांना प्रदूषण केल्याबद्दल नोटीस बजावण्यात आली. या नोटिशीनंतर केवळ ५० प्रकल्पांनी उत्तर देण्याची तसदी घेतली आहे. त्यामुळे उरलेल्या बांधकाम प्रकल्पांची यादी पुणे महापालिकेकडून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे कारवाईसाठी दिली जाणार आहे. अद्याप ही यादी महापालिकेकडून मिळाली नसल्याचे मंडळाचे म्हणणे आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणांतीस विसंवाद या निमित्ताने समोर आला आहे. सरकारी यंत्रणांच्या या सुस्तावलेपणामुळे प्रदूषणाची समस्या आणखी बिकट होऊन नागरिकांना स्वच्छ हवेसाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ येत आहे.

अखेर कारवाईचे पाऊल

पुण्यातील वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी अखेर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पाऊल उचलले आहे. प्रदूषणाबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी मंडळाकडे आल्या आहेत. त्यात पुणे शहर आणि भोवतालच्या परिसरातील रेडी मिक्स काँक्रिट प्रकल्पांच्या विरोधात जास्त तक्रारी आहेत. त्यामुळे या प्रकल्पांच्या ठिकाणी हवा प्रदूषण नियंत्रणासाठी केलेल्या उपाययोजनांची पाहणी मंडळाने सुरू केली आहे. याचबरोबर या प्रकल्पांच्या ठिकाणी हवेची तपासणी करण्यात येत आहे. एखाद्या प्रकल्पाच्या ठिकाणी जास्त प्रदूषण आढळल्यास त्यावर तातडीने मंडळाकडून कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी जगन्नाथ साळुंखे यांनी दिली.

sanjay.jadhav@expressindia.com

Story img Loader