केंद्र सरकारने देशभरातील ६५ शहरांमधून िपपरी-चिंचवडला ‘बेस्ट सिटी’ पुरस्कार देऊन गौरवले, त्याचे श्रेय सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसने वेळोवेळी घेतले. मात्र, राष्ट्रवादीचेच माजी महापौर आर. एस. कुमार यांनी मात्र हा पुरस्कार वशिल्याने व पैसे देऊन आणल्याचा आरोप पालिका सभेत केला व राष्ट्रवादीला घरचा आहेर दिला. एवढय़ावरच ते थांबले नाहीत. तर, महापालिकेत  संगनमताने होणाऱ्या चोरीतून १० टक्के रक्कम वाटावी लागते, असा रहस्यभेद केला. सर्वात कहर म्हणजे नगरसेवकपद हे कुत्र्याच्या गळ्यातील पट्टय़ासारखे आहे. दर पाच वर्षांनी आम्हाला नूतनीकरण करावे लागते, असे भयानक उदाहरणही त्यांनी दिले.
महापौर मोहिनी लांडे यांच्या अध्यक्षतेखालील विशेष सभेत अंदाजपत्रकावर चर्चा होती,आठ तासाहून अधिक काळ ही चर्चा सुरू होती, त्यामध्ये जवळपास ४० सदस्यांनी सहभाग घेतला. स्थायी समितीचे अध्यक्ष जगदीश शेट्टी यांनी सभेसमोर अंदाजपत्रक ठेवले व चर्चेला सुरुवात झाली. सदस्यांनी आपापल्या प्रभागातील प्रलंबित कामांची माहिती सभागृहासमोर मांडली. अधिकारी कामे करत नाहीत, ही तक्रार बहुतांश सदस्यांनी केली. अंदाजपत्रक चांगले आहे, असे कौतुक करतानाच त्यावर टीकाही झाली.
आर. एस. कुमार यांनी भाषणात पालिकेतील आतबट्टय़ाचा व्यवहार उघड करताना अंदाजपत्रकातील फोलपणा आकडेवारीसह उघड केला. अवघी २८ टक्के कामे झाली असून केलेली तरतूद खर्च होत नाही. अंदाजपत्रकाचे वेळापत्रक पाळले जात नाही. अधिकारी केवळ पालिकेचे पैसे लुटण्याचे काम करतात. कामाचा दर्जा चांगला नसतो. स्थापत्य कामांत वाळू, डांबर, सिमेंटचे प्रमाण खूपच कमी असते. संगनमताने चोरी होते, त्यातून १० टक्के वाटप केले जाते. प्रत्येक टेबलवर अधिकाऱ्यांना खुष करावे लागते. अशा पद्धतीने कामाची बोंब असताना व ५० टक्क्य़ाहून अधिक निधी खर्चच होत नसताना पालिकेला पुरस्कार मिळालाच कसा, या शब्दात कुमार यांनी वाभाडे काढले.
अधिकारी कामांना विलंब लावतात, जबाबदारी एकमेकांवर ढकलतात, अशी तक्रार उल्हास शेट्टी यांनी केली. सुरक्षिततेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचे सांगून सीसीटीव्ही बसवण्याचे काम तातडीने करावे, अशी सूचना त्यांनी केली. अनंत कोऱ्हाळे यांनी पालिकेत आर्थिक घोटाळ्यांची परंपरा असल्याचे सांगत घोटाळेबाज अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी केली. दापोडीतील समस्यांची माहिती देऊन राजेंद्र काटे यांनी अनेक प्रश्न सुटत नसल्याची खंत व्यक्त केली. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक प्रभागात अग्निशामक दलाची वाहने असावीत, पाणीगळती थांबवावी, अशी सूचना अपर्णा डोके यांनी केली. आपल्या प्रभागात आयुक्तांनी पाहणी दौरा केल्याने नागरिकांमध्ये समाधान असल्याचे शेखर ओव्हाळ यांनी नमूद केले. राहुल जाधव यांनी नवीन गावातील समस्यांची परिस्थिती मांडून त्यावर उपाययोजना करण्याची मागणी केली. विलास नांदगुडे यांनी अर्थसंकल्पात िपपळे निलखसाठी तरतूद नसल्याचे सांगून निषेध व्यक्त केला. अर्थसंकल्प म्हणजे आकडय़ांचा फुगवटा असल्याची टिपणी धनंजय आल्हाट यांनी केली. शांताराम भालेकर यांनी बहुचर्चित ‘हरिण उद्यान’ प्रकल्पाकडे पुन्हा लक्ष वेधले. या सभेत श्रीरंग बारणे, कैलास कदम, सीमा सावळे, चंद्रकांता सोनकांबळे, सुलभा उबाळे, शमीम पठाण, नारायण बहिरवाडे, अजित गव्हाणे, प्रशांत शितोळे, झामाबाई बारणे, सुजाता पालांडे, आशा शेंडगे, वैशाली जवळकर, अश्विनी चिंचवडे, शारदा बाबर, संजय काटे, रामदास बोकड आदींनी चर्चेत सहभाग घेतला.