स्थानिक संस्था कराच्या विरोधात व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदचा फटका पोलिसांच्या तपासालाही बसला आहे. घरफोडीच्या गुन्ह्य़ात अटक केलेल्या आरोपींनी चोरीचे दागिने विकलेली सराफांची दुकाने दाखविली आहेत. मात्र, या आंदोलनात ही दुकाने बंद असल्यामुळे चोरीचे दागिने हस्तगत करण्यात अडचणी येत असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले आहे.
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शहरात घरफोडी करणाऱ्या तिघांच्या टोळीला अटक केली. त्यांच्याकडून येरवडा, सहकारनगर, दत्तवाडी येथील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले. न्यायालयाने तिघांना तपासासाठी पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलीस कोठडीत तपास करताना आरोपींनी केलेल्या घरफोडीच्या चोऱ्यांमध्ये चार लाख ३१ हजार रुपयांचा ऐवज चोरला आहे. यामध्ये चोरलेले सोन्या-चांदीचे दागिने शहरातील काही सराफांना विकल्याचे सांगून ती सराफी दुकाने दाखविली. मात्र, महापालिकेच्या हद्दीत एलबीटी कायदा लागू केल्याच्या निषेधार्थ सराफा दुकानदार व व्यापाऱ्यांनी बेमुदत बंद पुकारल्यामुळे गुन्ह्य़ातील चोरीचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत झालेले नाहीत. दुकाने चालू होताच हा माल हस्तगत करायचा आहे, असा युक्तिवाद पोलिसांनी न्यायालयात केला. हा युक्तिवाद ग्राह्य़ धरून न्यायालयाने रुपेश बबन काझी, जुबेर ऊर्फ समीर जमीर खान आणि मनोज  ऊर्फ मन्या विजय भावसार यांच्या पोलीस कोठडीत वाढ केली आहे.