महापालिकेच्या व्हाॅट्सॲप चॅटबॅट प्रणालीचा विस्तार करण्यात येणार असून आता विविध प्रकारची हरकत प्रमाणपत्र, अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक यांची माहिती या प्रणालीअंतर्गत नागरिकांना मिळणार आहे. यापूर्वी मिळकतकर आणि पाणीपट्टी भरण्याची सुविधा व्हाॅट्सॲप क्रमांकावरून दिली जात होती.
हेही वाचा >>>पुणे हादरलं! १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांना ऑनलाइन सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. क्षेत्रीय कार्यालय तसेच मुख्य भवनात ही सुविधा आहे. त्यानंतर महापालिकेने व्हाॅट्सॲप चॅटबॅट प्रणालीचा उपयोग करून जलदगतीने सेवा देण्याचा निर्णय घेतला होता. त्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात मिळकतकर आणि पाणीपट्टी भरण्याची सुविधा ८८८८२५१००१ या व्हाॅट्सॲप विशेष क्रमांकावर उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र आता या क्रमांकावरून अन्य सेवाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. येत्या काही दिवसांत विस्तारण्यात आलेली सुविधा नागरिकांना मिळणार आहे.
हेही वाचा >>>पुणे: शहरात तीन वर्षांत आगीच्या ५४६ घटना
महापालिकेच्या व्हाॅट्सॲप क्रमांकावर सेवेचा विस्तार करण्यासाठी संगणक विभागाकडून चाचपणी सुरू आहे. त्यामध्ये जन्म-मृत्यू दाखले, पाळीव प्राण्यांची नोंदणी, बांधकाम प्रस्ताव दाखल करणे, आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांसह खातेप्रमुखांचे नंबर, विविध विभागांची माहिती, तक्रार नोंदणी या सुविधा व्हॉट्सॲपवरून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी सांगितले. सध्या या प्रणालीची तांत्रिक कामे अंतिम टप्प्यात आहेत.