पुणे : देशात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या वाहनांच्या बॅटरीच्या व्यवस्थापनाचे अत्याधुनिक तंत्रज्ञान, अवजड वाहनांसाठी ओव्हरहेड चार्जिंग तंत्रज्ञान आणि भविष्यातील इंधन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हायड्रोजनवर चालणारी मालमोटार अशा वाहन उद्योगातील भविष्यवेधी संकल्पनांची मांडणी ‘सिॲट २०२४’मध्ये करण्यात आली आहे. ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) संस्थेतर्फे १८ व्या ‘सिम्पोझियम ऑन इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह टेक्नोलॉजी’ अर्थात ‘सिॲट २०२४’चे आयोजन करण्यात आले आहे.
बॅटरी व्यवस्थापन यंत्रणा
इलेक्ट्रिक वाहनांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. विद्यार्थी, संशोधकांना या वाहनांची बॅटरी कशा पद्धतीने काम करते आणि त्यातील विविध भागांचे व्यवस्थापन कसे होते, हे समजावे, या हेतूने एआरएआय अकादमीच्या वतीने बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम ट्रेनर (बीएमएसटी) तयार करण्यात आले आहे. सिम्युलेटरप्रमाणे बॅटरी कोणत्या वेळी कसा प्रतिसाद देईल हे समजणे आणि ते पाहणे यामुळे आता सहज शक्य होईल, अशी माहिती यावेळी एआरएआय अकादमीचे संजय पाटील यांनी दिली.
हेही वाचा >>>जरांगे यांची पदयात्रा पिंपरी-चिंचवडमध्ये
ओव्हरहेड चार्जिंग यंत्रणा
इलेक्ट्रिक दुचाकी व मोटारींमध्ये चार्जिंगसाठी १०० किलोवॉट क्षमतेचा चार्जर वापरला जातो. या क्षमतेने बॅटरी चार्ज होण्यासाठी तीन तासांचा कालावधी लागतो. बस, मालमोटारी अशा अवजड इलेक्ट्रिक वाहनांसाठी सुयोग्य अशी चार्जिंग यंत्रणा विकसित करण्यावर सध्या एआरएआय काम करीत आहे. ओव्हरहेड ऑटोमेटेड चार्जिंग डिव्हाईस (ओएचसीडी) असे त्याचे नाव आहे. या चार्जरची क्षमता ६०० किलोवॉट असून या चार्जरद्वारे ० ते ८० टक्के बॅटरी चार्ज करण्यासाठी केवळ २५ मिनिटांचा अवधी लागेल. या चार्जरचे प्रतिरूप एआरएआयने तयार केले असून हे विकसित तंत्रज्ञान पुढील वर्षभरात बाजारपेठेमध्ये उपलब्ध असेल, अशी माहिती एआरएआयचे उपसंचालक अभिजित मुळे यांनी दिली.
हायड्रोजन इंधनावरील वाहने
हायड्रोजन हे वाहनांसाठीचे महत्त्वाचे इंधन म्हणून विकसित होणार असून, प्रदर्शनात हायड्रोजनवर चालणारी बस, मालमोटार, हायड्रोजनवर चालणारे टाईप ४ सिलिंडर, हायड्रोजन फ्युएल किट आदी मांडण्यात आले आहेत. एखाद्या वाहन उत्पादकाने हायड्रोजनवर चालणारी वाहने विकसित करून बाजारात आणल्यास त्या वाहनाचे सुटे भाग आणि वाहनाची संपूर्ण चाचणी करण्यास आता एआरएआय सज्ज आहे. या सर्व चाचण्यांसाठी आवश्यक पायाभूत सोयीसुविधा आणि प्रक्रिया आता एआरएआयमध्ये उपलब्ध करण्यासाठी तयारी सुरु आहे, अशी माहिती एआरएआयचे वरिष्ठ उपसंचालक सुकृत ठिपसे यांनी दिली.
एआरएआयच्या वतीने हायड्रोजनवर चालणाऱ्या इंजिनाची निर्मिती हाती घेण्यात आली आहे. हे इंजिन भारत सरकारच्या बीएस ६ मानांकनांची पूर्तता करणारे असेल. याचबरोबर वाहन उत्पादकांनी हायड्रोजनवर चालणारी वाहने विकसित केल्यास त्याची चाचणी करण्यास एआरएआय सज्ज आहे.- सुकृत ठिपसे, वरिष्ठ उपसंचालक, एआरएआय