पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणारा गुंड निलेश घायवळ पुन्हा चर्चेत आला आहे. कोथरुडमधील गुंड गजानन मारणे आणि निलेश घायवळ या दोन टोळ्यांमधील वर्चस्वाच्या वादातून टोळीयुद्ध भडकले होते. दोन्ही टोळ्यांविरुद्ध पोलिसांनी कठोर कारवाई केली होती. निलेश घायवळ एकेकाळी गजानन मारणे याचा जवळचा मित्र आणि विश्वासू साथीदार मानला जायचा. मारणे टोळीची दहशत कोथरुडसह पुणे शहर, मुळशी तालुक्यात वाढली. मारणे आणि घायवळने अनेक तरुणांना टाेळीत सामील करून घेतले.
हेही वाचा >>> मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांची ‘वर्षा’वर भेट घेणारा हेमंत दाभेकर कोण?
मुळशी तालुक्यातील जमीन व्यवहारात मारणे टोळीने शिरकाव केला. जमीन व्यवहारातून करोडो रुपयांची दलाली, तसेच खंडणी मिळाल्याने टोळीचा विस्तार झाला. घायवळ आणि मारणेला मानणारे तरुण टोळीत होते. वर्चस्व, आर्थिक व्यवहारातून दोघांमध्ये सुप्त संघर्ष सुरू होता. अखेर दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली. मारणे टोळीत उभी फूट पडली आणि घायवळने स्वत:ची टोळी सुरू केली. खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, खंडणी असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या घायवळने टोळीचे वर्चस्व वाढविण्यास सुरुवात केली. त्यातून मारणे आणि घायवळ टाेळीतील सराइतांनी भरदिवसा हल्ले सुरू केले. टोळीयुद्धातून तीन जणांचे खून झाले. घायवळ आणि मारणे टोळीविरुद्ध पोलिसांनी कठोर कारवाई केली. दोन्ही टोळ्यांमधील संघर्ष शमविण्यसाठी भारतीय जनता पक्षातील एका नेत्याने प्रयत्न केले. त्यानंतर घायवळ आणि मारणे टोळीतील संघर्ष शमला