पुणे : पुण्यात मध्यम आकाराच्या घरांना मागणी वाढली आहे. यंदा जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत पुण्यात एकूण १३ हजार २०० घरांची विक्री झाली असून, त्यातील ५ हजार ९४६ मध्यम आकाराची आहेत. यंदा तिसऱ्या तिमाहीत घरांच्या विक्रीत पुण्याचे स्थान देशात तिसरे आहे.
नाइट फ्रँक इंडियाने पुण्यातील मालमत्ता क्षेत्राचा अहवाल जाहीर केला आहे. त्यात पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागाचा समावेश आहे. या अहवालानुसार, गेल्या वर्षातील तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेत यंदा घरांच्या विक्रीत किरकोळ १ टक्का वाढ नोंदविण्यात आली आहे. यंदा तिसऱ्या तिमाहीत एकूण १३ हजार २०० घरांची विक्री झाली आहे. त्यातील ४५ टक्के घर मध्यम आकाराची म्हणजेच ५० लाख ते १ कोटी रुपये किमतीची आहेत. नवीन घरांचा पुरवठा १५ हजार ४९ असून, त्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत ४२ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे.
हेही वाचा >>>हनुमान टेकडीवर कोयत्याच्या धाकाने महाविद्यालयीन तरुणाची लूट; चोरट्यांच्या मारहाणीत तरुण जखमी
पुण्यात घरांच्या सरासरी किमतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत ५ टक्के वाढ झाली आहे. यंदा तिसऱ्या तिमाहीत घरांचा सरासरी भाव प्रति चौरस फूट ४ हजार ६८६ रुपयांवर पोहोचला आहे. एकूण विक्रीत १ कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमत असलेल्या घरांचे प्रमाण २३ टक्के आहे. याच वेळी ५० लाख रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या घरांचे प्रमाण ३२ टक्के आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
कार्यालयीन जागांना वाढती मागणी
यंदा तिसऱ्या तिमाहीत पुण्यात एकूण २६.५ लाख चौरस फूट कार्यालयीन जागांचे व्यवहार झाले. त्यातील ११ लाख चौरस फूट म्हणजेच ४१ टक्के व्यवहार हे जागतिक सुविधा केंद्रांसाठी झाले आहेत. तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्राशी निगडित परिसंस्था पुण्यात विकसित झाल्याने जागतिक सुविधा केंद्रासाठी पुण्याला पसंती मिळत आहे. तसेच, कार्यालयीन जागा सहकार्याचे ४.५ लाख चौरस फुटांचे व्यवहार झाले, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा >>>कौटुंबिक वादातून महिलेचा खून; सहा वर्षांच्या मुलाला घेऊन पती पसार
पुण्यातील घरांची विक्री (जुलै ते सप्टेंबर)
किंमत – घरांची संख्या
५० लाख रुपयांपेक्षा कमी – ४,२४९
५० लाख ते १ कोटी रुपये – ५,९४६
१ कोटी रुपयांपेक्षा जास्त – ३,००५