श्रीराम ओक shriram.oak@expressindia.com
समाजातील एखादा प्रश्न किंवा विषय हाती घेऊन तो सोडवण्यासाठी सातत्याने काम करणाऱ्या अनेक सामाजिक संस्था पुण्यात आहेत. या संस्थांनी सेवाध्यासाचा आदर्श उभा केला आहे. विविध सामाजिक प्रश्न-समस्या सोडविण्यासाठी कार्य करणाऱ्या अशा संस्थांची ओळख ‘सेवाध्यास’ या सदरातून होईल. ज्या योगे एखादी समस्या उद्भवली तर संबंधित सामाजिक संस्थेची जशी मदत घेता येईल, तसेच विशिष्ट सेवाकार्यासाठी आर्थिक योगदानापासून ते संस्थेसाठी काही वेळ देण्याची इच्छा असणाऱ्यांपर्यंत सर्वाना उपयुक्त माहितीही मिळू शकेल.
समाज या शब्दाबरोबरच समाजोन्नती, समाजविकास हे शब्द जसे येतात, तसेच सामाजिक भान आणि त्याला जोडून सामाजिक कार्य हे शब्दही ओघाने येतात. समाज म्हटले की विविध विचार, आचार आणि त्याअनुषंगिक प्रश्नही आलेच. दाही दिशांना विखुरलेल्या समाजात विविध मनोवृत्तीच्या व्यक्ती असल्याने सामाजिक प्रश्न निर्माण होण्यासाठी जसे त्यांचे विचार कारणीभूत ठरतात, तसेच ते सोडवण्यासाठीदेखील हेच विचार उपयुक्त ठरतात.
विविध सामाजिक प्रश्न वैयक्तिक पातळीवर नेटाने सोडविणारी जशी मंडळी असतात, तसेच हे प्रश्न हाताळणाऱ्यांचा समूहदेखील सामाजिक संस्थांमध्ये कार्यरत असतो. त्या समूहातील मंडळींनी हे प्रश्न सोडविण्यासाठी विशेष प्रशिक्षणदेखील घेतलेले असते. प्रश्न समजून-उमजून घेण्यासाठी पुस्तकी, महाविद्यालयीन ज्ञानाबरोबरच काही जण काम करता करता अनुभव घेत असतात, तर काही जण केवळ गाठीशी असलेल्या अनुभवावर आधारित काम करत असतात. त्या अनुभवांचा उपयोग सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी ते अधिक सजगतेने करतात.
आपल्या आवडत्या क्षेत्रात करीअर म्हणून सामाजिक कार्य करण्याकडे जरी अनेकांचा कल वाढत असला तरीदेखील विविध सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी यंत्रणा असावी लागते. ही यंत्रणा म्हणजेच या सामाजिक संस्था. सामाजिक प्रश्न हे केवळ आणि केवळ शासकीय पातळीवर सोडवले जाणे अशक्य असल्यामुळे विविध प्रकारचे प्रश्न सोडविण्यासाठी सामाजिक संस्थांनी त्यांचे त्यांचे कार्यक्षेत्र ठरवलेले असते. ठराविक कार्यक्षेत्रांमध्ये सामाजिक संस्था कार्यरत असल्यामुळे प्रश्न सोडविण्याचा वेग आणि त्यातील अचूकता वाढते.
शासकीय अनुदान घेणाऱ्या या तत्त्वावर जरी काही संस्था कार्यरत असल्या तरी अनेक संस्था या केवळ लोकाश्रयावर म्हणजेच समाजातील घटकांनी दिलेल्या देणग्यांवरच अवलंबून असतात. काही सामाजिक संस्थांमधील देणग्यांवर कर सवलत मिळते म्हणून जरी काही देणगीदार देणग्या देत असले तरी त्यातून सामाजिक संस्थेला देणगी मिळते हे महत्त्वाचे आहे. या देणग्या देत असताना संस्थांची कायदेशीर नोंदणी झाली आहे की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरते. अशा नोंदणीकृत संस्थेला जर देणगी दिली तर त्या देणगीचा विनियोग योग्यप्रकारे होण्याची शक्यता वाढते.
अनेक संस्था, विविध छोटय़ामोठय़ा संघटना किंवा स्वमदत गट विविध सामाजिक प्रश्न सोडविण्याच्या कार्यात सज्ज असतात. स्वमदत गटामुळे विशिष्ट आजार किंवा समस्या असलेल्यांचाच प्रश्न सुटण्यास जरी मदत झाली तरी हे कार्यदेखील तेवढेच मोठे असते.
गृहिणी, व्यावसायिक, नोकरदार, सेवाव्रती, महाविद्यालयीन तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या संघटना एकत्र येऊन त्यांच्या त्यांच्या पातळीवर अथवा एकत्रितपणे एखादी सामाजिक समस्या दूर होण्यासाठी विविध पातळय़ांवर काम करतात. त्यामध्ये विविध सामाजिक संस्थांसाठी देणगी गोळा करण्यापासून ते एखाद्या प्रश्नाबाबत जागरूकता निर्माण करण्यापर्यंत विविध कामे केली जातात. काही संस्थांचे कार्य वरकरणी अगदी छोटे वाटू शकते, पण जे भविष्यात भव्य रूप धारण करू शकते. या कामांमुळे सामाजिक संस्थांमध्ये जरी वाढ होत असली तरी दिवसेंदिवस वाढत जाणारे सामाजिक प्रश्नदेखील उग्र रूप धारण करीत आहेत. दैनंदिन जीवनातील निराधार लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंतचे विविध प्रश्न, प्रदूषणाच्या विविध समस्या, निरक्षरता-बेरोजगारी-विविध आजार यांशिवाय लहान मुलांवर तसेच ज्येष्ठांवर होणारे अत्याचार आदी समस्यांसाठी लढा देताना जातिभेदाच्या पलीकडे जाऊन या सामाजिक संस्था कार्यरत असतात.
या सदरातून विविध सामाजिक समस्यांसंदर्भात कार्यरत असणाऱ्या संस्थांची माहिती अनेकविध प्रकारे आणि विविध कारणांनी वाचकांना उपयोगी पडेल याची खात्री वाटते.