पुणे : शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची माहिती नागरिकांना आता एका क्लिकवर मिळणार आहे. तसेच स्वच्छतागृहांमधील पायाभूत सुविधा आणि स्वच्छतेसंदर्भात तक्रारही ‘टाॅयलेट सेवा ॲप’वर करता येणार आहे. या उपयोजन (ॲप) नागरिकांच्या वापरासाठी गुरुवारपासून सुरू करण्यात आले.
शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्थिती काय आहे, ती कुठल्या भागात आहेत, याची माहिती या उपयोजनावर आहे. अमोल भिंगे यांनी हे उपयोजन (ॲप) विकसित केले आहे. महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांच्या हस्ते उपयोजनाची सेवा नागरिकांसाठी सुरू करण्यात आली. त्याबाबतची माहिती आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी दिली. अतिरिक्त आयुक्त डाॅ. कुणाल खेमनार, घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त आशा राऊत या वेळी उपस्थित होते.
शहरातील एक हजार १८३ सार्वजनिक स्वच्छतागृहांची माहिती त्यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. या उपयोजनाच्या माध्यमातून स्वच्छतागृह शोधण, स्वच्छतागृहात असलेल्या सुविधांची माहिती घेणे शक्य होणार आहे. स्वच्छतागृहाचे ठिकाण कुठे आहे, हे ही या माध्यमातून कळणार आहे. वाॅशबेसिन, पाणी, जंतुनाशक द्रावण, साबण, महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन अशा सुविधा असलेल्या स्वच्छतागृहांची माहिती या ॲपमध्ये स्वतंत्रपणे मिळणार आहे. स्वच्छतागृहातील पायाभूत सुविधांबाबत नागरिकांना गुणांकन देण्याची सुविधाही ॲपमध्ये देण्यात आली आहे. तसेच तक्रारही नोंदविता येणार आहे.