धार्मिक स्थळांपासून साहसी खेळांपर्यंत आणि महाबळेश्वर-माथेरानपासून ते थायलंडपर्यंतच्या देश-विदेशातील पर्यटन स्थळांची माहिती पुणेकरांना एका छताखाली मिळणार आहे. डेक्कन कॉलेजच्या मैदानावर सुरू झालेल्या इंडिया इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्ट या प्रदर्शनाद्वारे हे पर्यटनाचे दालन खुले झाले आहे.
स्पिअर ट्रॅव्हल मीडिया यांनी आयोजित केलेल्या या प्रदर्शनाचे यंदा १२ वे वर्ष आहे. महाराष्ट्रासह नऊ राज्ये आणि आठ देशांच्या पर्यटन विभागांचा सहभाग असलेले हे प्रदर्शन रविवापर्यंत (२४ नोव्हेंबर) सकाळी दहा ते रात्री आठ या वेळात खुले राहणार आहे. विविध राज्यांतील ट्रॅव्हल कंपन्या, टूर ऑपरेटर, हॉटेल आणि रिसोर्टस, ट्रॅव्हिलग पोर्टल याविषयीच्या माहितीबरोबरच विविध प्रकारची टूर पॅकेजेसदेखील या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
स्पिअर ट्रॅव्हल मीडियाचे संचालक रोहित हनगल म्हणाले, धकाधकीच्या जीवनातून थोडासा बदल आणि विश्रांती म्हणून प्रत्येकाला पर्यटन करणे आवश्यक झाले आहे. त्यामुळे पर्यटन व्यवसायाचा विस्तार झाला आहे. देशविदेशातील पर्यटनस्थळांची माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणे हा या प्रदर्शनाचा उद्देश आहे. या प्रदर्शनाला दरवर्षी प्रतिसाद वाढत असून यंदा तीन दिवसांमध्ये १५ हजार नागरिक प्रदर्शनाला भेट देतील अशी अपेक्षा आहे.
पर्यटनविश्वाची माहिती एका छताखाली
धार्मिक स्थळांपासून साहसी खेळांपर्यंत आणि महाबळेश्वर-माथेरानपासून ते थायलंडपर्यंतच्या देश-विदेशातील पर्यटन स्थळांची माहिती पुणेकरांना एका छताखाली मिळणार आहे.
First published on: 23-11-2013 at 02:42 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Information about tourism in india by exhibition