पुणे : इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन नीलेकणी यांनी आयआयटी मुंबईतून १९७३मध्ये विद्युत अभियांत्रिकीची पदवी संपादन केली होती. आयआयटी मुंबई या संस्थेबरोबरचे ५० वर्षांचे नाते त्यांनी अनोख्या पद्धतीने साजरे केले आहे. आयआयटी मुंबईमध्ये पायाभूत सुविधांची निर्मिती, उदयोन्मुख क्षेत्रातील संशोधनाला चालना देण्यासाठी आता नीलेकणी यांनी तब्बल ३१५ कोटी रुपयांची (३८.५ मिलियन डॉलर्स) देणगी दिली आहे.
नीलेकणी यांनीच या बाबत ट्विटद्वारे माहिती दिली. या देणगीच्या अनुषंगाने आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. सुभाष यादव आणि नीलेकणी यांनी बंगळुरू येथे सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. भारतातील कोणत्याही आयआयटीला माजी विद्यार्थ्याकडून मिळालेली ही सर्वांत मोठी देणगी ठरली आहे. या पूर्वी नीलेकणी यांनी ८५ कोटींची देणगी आयआयटी मुंबईला दिली होती. त्यामुळे एकट्या नीलेकणी यांच्याकडून ४०० कोटींचा निधी आयआयटी मुंबईला प्राप्त झाला.
माझ्या जडणघडणीला आयआयटी मुंबईत दिशा मिळाली, माझ्या आयुष्याचा पाया घातला गेला. या संस्थेबरोबर माझे ५० वर्षांचे नाते आहे. ही देणगी म्हणजे केवळ आर्थिक योगदान नाही, तर ज्या संस्थेने मला खूप काही दिले त्यासाठीचे अभिवादन आहे, अशा शब्दांत नीलेकणी यांनी भावना व्यक्त केली.