बारामती नगरपरिषदेने गुंठेवारी कायद्यानुसार घरे नियमित करण्याची प्रक्रिया सुरू केली असून त्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मध्यमवर्गीय पुणेकरांनाही अशाचप्रकारे संधी मिळणे आवश्यक असल्यामुळे पुणे महापालिकेनेही चार वर्षांपूर्वी थांबवलेली गुंठेवारीची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी मागणी आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
सर्वसामान्य मध्यमवर्गीय पुणेकरांनी घराचे स्वप्न साकार करण्यासाठी छोटे-छोटे भूखंड घेऊन तेथे बांधकाम केले आहे. अशी घरे नियमित करण्याची प्रक्रिया महापालिकेने राज्य शासनाच्या आदेशानुसार सुरू केली होती. मात्र, गुंठेवारीअंतर्गत झालेली बांधकामे तसेच भूखंड नियमित करण्याची प्रक्रिया महापालिकेने थांबवली आहे, याकडे पुणे जनहित आघाडीने एका पत्राद्वारे आयुक्तांचे लक्ष वेधले आहे.
बारामती नगरपरिषदेने गुंठेवारी प्रक्रिया सुरू केली असून नागरिकांना डिसेंबपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. पुण्यातही गुंठेवारी प्रक्रिया सुरू करणे आवश्यक असून त्यासाठी कार्यकारी अभियंता दर्जाचा अधिकारी नियुक्त करून डिसेंबर २०१३ पर्यंत गुंठेवारी कायद्यांतर्गत झालेल्या इमारती, घरे व भूखंड नियमित करून द्यावेत आणि मध्यमवर्गीय पुणेकरांना दिलासा द्यावा, अशी मागणी जनहित आघाडीचे अध्यक्ष उज्ज्वल केसकर आणि समन्वयक विनय हर्डीकर यांनी केली आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Initiate gunthewari system to give solace to middle class
Show comments