गणेश यादव, लोकसत्ता

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी : नद्यांचे संवर्धन करण्यासाठी नदी सुरक्षा दलाची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मदत घेण्यात येणार आहे. नदीकाठच्या परिसरात ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. नद्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा बांधकाम राडारोडा, कचरा टाकणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.

पिंपरी- चिंचवड शहरातून पवना, इंद्रायणी आणि मुळा या तीन नद्या वाहतात. नदी संवर्धनासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. सांडपाणी, नाल्यांमधून नदीमध्ये दूषित किंवा मैलामिश्रीत पाणी जाऊ नये, यासाठी सर्वेक्षण सुरू आहे. या सर्वेक्षणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. नाल्यांद्वारे नदीमध्ये कचरा, प्लॅस्टीक, दूषित पाणी जाऊ नये यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. शहरात अनेक ठिकाणी जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आले असून नवीन प्रकल्पांचे काम प्रगतिपथावर आहे.

आणखी वाचा-ऑनलाइन जुगारातून करोडपती झालेल्या पीएसआयचं अखेर निलंबन; पोलीस खात्याची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका

महापालिका हद्दीतील पवना, इंद्रायणी नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी उगमापासून ते संगमापर्यंत पाहणी करण्यात येत आहे. नदीपात्रात कचरा टाकताना कोणी आढळल्यास त्या व्यक्तीचे किंवा त्या परिसराचे छायाचित्र काढून स्मार्ट सारथी उपयोजन (ॲप) मधील ‘पोस्ट अ वेस्ट’ या सुविधेच्या आधारे विद्यार्थी महापालिकेशी संपर्क साधू शकतात. माहिती मिळताच महापालिकेच्या वतीने संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल. तसेच नदीकाठी पडलेला राडारोडा किंवा कचरा उचलण्यात येईल.

पथनाट्य, पदयात्रा यांद्वारे नदीकाठच्या नागरिकांमध्ये जनजागृती केली जाईल. नदी संवर्धनासाठी विद्यार्थी, शिक्षक, सामाजिक संस्थांनी सहकार्य करावे. -शेखर सिंह, आयुक्त

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Initiative of pimpri chinchwad municipal corporation for the conservation of rivers pune print news ggy 03 mrj