‘रांजणगाव औद्योगिक क्षेत्रात नोकरी मिळेल, अशी माहिती एकाकडून मिळाली. त्यामुळे शिवाजीनगरहून निघालो. परंतु, वाघोलीला पोहोचेपर्यंत शेवटची बस निघून गेली होती. त्यामुळे रस्त्याच्या कडेला पदपथावर झोपलो. पहाटेच्या वेळी अचानक मोठ्या आवाजाने जाग आली. पण उठून मागे सरकण्यासही वेळ मिळाला नाही…’ अंगावर काटा आणणारा अनुभव वाघोलीतील अपघातात जखमी झालेला तरुण कथन करत होता…
वाघोलीत भरधाव डंपरने पदपथावर झोपलेल्या नागरिकांना चिरडले. या अपघातात संगमनेर येथील सुदर्शन वैराट (वय १८) हा तरुण जखमी झाला आहे. त्याच्या उजव्या पायाचे हाड तुटले असून, त्याच्यावर ससून सर्वोपचार रुग्णालयातील अस्थिव्यंगोपचार विभागात उपचार सुरू आहेत. सुदर्शन नोकरीच्या शोधात पुण्यात आला होता. त्याच्या ओळखीच्या एका व्यक्तीने सुरुवातीला शिवाजीनगर भागातील हॉटेलमध्ये सुरक्षारक्षक म्हणून नोकरीस लावले. तिथे राहण्याची सोय नसल्याने पाच ते सहा दिवसांत सुदर्शनने नोकरी सोडली. त्याला रांजणगाव औद्योगिक क्षेत्रात नोकरी मिळत असल्याचे समजले. त्यामुळे तो रविवारी शिवाजीनगरहून वाघोलीकडे निघाला होता.
हेही वाचा >>> अपघातस्थळी अजित पवार यांची भेट, मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत देण्याचा निर्णय
‘शिवाजीनगरहून वाघोलीला पोहोचण्यास मला उशीर झाला. माझ्याकडे जेवणासाठी पैसे नसल्याने मी आईला कॉल केला. आईने मला पैसे पाठविल्यानंतर मी जेवण केले. वाघोलीहून रांजणगावला जाण्यासाठी बस नसल्याने काय करायचे, हा प्रश्न होता. वाघोलीत रस्त्याच्या कडेला पदपथावर अनेक जण झोपले होते. त्यामुळे रात्री इथेच झोपावे आणि सकाळी रांजणगावला जावे, असा विचार मी केला. तिथे झोपलेल्या एका वृद्ध व्यक्तीकडून मी अंगावर पांघरण्यासाठी चादर घेतली. रात्री अचानक मोठा आवाज आला. मी डोळे उघडून पाहिले, तर वेगाने अंगावर आलेला डंपर मला दिसला. मला मागे सरकण्यासही वेळ मिळाला नाही. मी काही हालचाल करेपर्यंत डंपर माझ्या पायावरून गेला होता. अचानक मोठा आरडाओरडा झाल्याने लोक जमा झाले आणि त्यांनी माझ्यासह इतर जखमींना वाघोलीतील रुग्णालयात हलविले. तिथून आम्हाला ससून रुग्णालयात आणण्यात आले,’ असे सुदर्शनने सांगितले.
हेही वाचा >>> वाघोलीतील घटनेची पुनरावृत्ती टळली; मावळमध्ये भरधाव टेम्पो पलटी, मद्यधुंद चालकाला बेड्या
अजूनही अपघाताच्या धक्क्यात या अपघातात रेनिशा पवार ही महिला आणि रोशन भोसले हा ७ वर्षांचा मुलगा जखमी झाले आहेत. या दोघांवर ससूनमध्ये उपचार सुरू आहेत. रोशन वाघोलीत सिग्नलवर फुगे विकतो. मात्र, अपघाताच्या धक्क्यातून तो अद्याप सावरलेला नाही. त्याला नातेवाइकांची नावेही व्यवस्थित सांगता येत नाहीत. त्याच्या उजव्या पायाचे हाड मोडले आहे. तो रुग्णालयातील डॉक्टरांसह परिचारिकांना, ‘मी कधी बरा होणार,’ एवढाच प्रश्न विचारत आहे.