पुणे : नवकल्पनांच्या पातळीवर असलेल्या उद्योजकीय शक्यतांना, व्यावहारिक पातळीवरील वास्तविक उद्योगक्षेत्राशी जोडता यावे, यासाठी अनुकूल अशा वातावरणाची आणि मंचाची निर्मिती करण्याच्या हेतूने राष्ट्रीय बौद्धिक संपदा (आयपी) यात्रेचे आयोजन केले आहे. नवउद्योजकांना संजीवनी देणारा हा उपक्रम आहे, असे प्रतिपादन केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) मंत्रालयाचे सहायक संचालक अभय दफ्तरदार यांनी बुधवारी केले.
केंद्रीय ‘एमएसएमई’ मंत्रालयाच्या सहयोगाने एआयसी पिनॅकल आंत्रप्रेन्युअरशिप फोरमच्या वतीने आयोजित दुसऱ्या राष्ट्रीय बौद्धिक संपदा यात्रेच्या उद्घाटनप्रसंगी दफ्तरदार बोलत होते. यावेळी केंद्र सरकारच्या पेटंट अँड डिझाईन विभागाचे सहनियंत्रक आशिष प्रभात, पिनॅकल इंडस्ट्रीज ग्रुपचे अध्यक्ष अरिहंत मेहता, नेदरलँडमधील टेक्निकल ट्रान्सफर ऑफिसर डेनिस बेव्हर्स, दलित इंडियन चेंबर कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या (डिक्की) राष्ट्रीय संयोजिका मैत्रेयी कांबळे, फोरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील धाडीवाल आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना दफ्तरदार म्हणाले की, एखादी नवकल्पना उद्योजकीय शक्यतांनी परिपूर्ण असते, तेव्हा कल्पनेपासूनचा प्रवास प्रत्यक्ष उद्योगाच्या उभारणीपर्यंत पोहोचण्यासाठी युवा उद्योजकांना अनुकूल वातावरण, सल्लासेवा तसेच मार्गदर्शन पुरवले जाते. त्यासाठी इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी फॅसिलिटेशन सेंटरच्या (आयपीएफसी) माध्यमातून काम केले जाते. नवउद्यमींना पेटंट, ट्रेडमार्क, स्वामित्व हक्क (कॉपीराईट), जिओ टॅग, इंडस्ट्रीयल डिझाईन अशा अनेक तांत्रिक घटकांची माहिती व मार्गदर्शन दिले जाते.
बौद्धिक संपदा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय पातळीवरची माहिती देणे, तंत्रज्ञान देवाणघेवाण आणि बौद्धिक संपदा व्यावसायिकरण, अशा तीन मुद्यांवर आधारित ही दोन दिवसीय यात्रा आहे. सुनील धाडीवाल यांनी प्रास्ताविकात एआयसी पिनॅकल आंत्रप्रेन्युअरशीप फोरमच्या कार्याचा आढावा घेतला. पूनम नहार यांनी सूत्रसंचालन केले.
सहा महिन्यांत पेटंट प्रक्रिया
आधुनिक काळात नवउद्यमी (स्टार्टअप) ते उद्योग हा प्रवास गुंतागुंतीचा आहे. त्यामुळे नवकल्पनेचे रूपांतर व्यवसायात होण्यापर्यंतचा प्रवास सुरळीत होण्यासाठी पेटंट आणि डिझाईन प्रमाणित करणे गरजेचे आहे. विभागाच्या माध्यमातून आम्ही गेल्या वर्षभरात १० लाख युवकांपर्यंत पोहोचलो आहोत. पेटंटप्रक्रिया ६ महिन्यांत पूर्ण केली जाते. सध्या सुमारे ७५ हजार पेटंट दाखल होण्याच्या प्रक्रियेत आहेत, असे आशिष प्रभात यांनी सांगितले.