पिंपरी- चिंचवड : पिंपरी- चिंचवड महानगर पालिकेच्या थेरगाव येथील माध्यमिक शाळेत मोफत रायफल शूटिंगचे प्रशिक्षण दिले जात आहे. विशेष म्हणजे या शाळेतील मुख्याध्यापक चंद्रशेखर कदम यांनी मोडकळीस आलेले टेबल आणि इतर टाकाऊ साहित्य वापरून रायफल शूटिंग प्रशिक्षण केंद्र तयार केले आहे. ह्या प्रशिक्षण केंद्रात महानगर पालिकेच्या शाळेतील मुलांना मोफत प्रशिक्षण दिले जाते. विजय रणझुंजारे हे मुलांना प्रशिक्षण देतात. रायफल शूटिंगची रेंज दहा मीटर इतकी आहे.
महानगर पालिकेची किंवा शासकीय शाळा म्हटले की पालक दुर्लक्ष करतात ही वस्तुस्थिती आहे. आपला मुलगा इंग्रजी माध्यमातून शिकावा अशीच इच्छा प्रत्येक पालकांची असते. त्याच्या प्रत्येक कलागुणांना वाव मिळेल अशी अपेक्षा ते बाळगून असतात. त्याबाबतचे चित्र आता बदलायला लागले आहे. पिंपरी- चिंचवड महानगर पालिकेच्या शाळेत ही उत्तम दर्जाचे शिक्षण मिळते हे वारंवार पुढे आले आहे. थेरगाव येथील महानगर पालिकेच्या माध्यमिक विद्यालयाने टाकाऊ वस्तूंपासून रायफल शूटिंगचे प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. येथील प्रशिक्षण केंद्रात सकाळ आणि संध्याकाळच्या सत्रात २५ ते ३० मुले प्रशिक्षण घेत आहेत. नुकतच जिल्ह्यास्तरीय रायफल शूटिंगची स्पर्धा ह्या शाळेत पार पडली आहे.
हेही वाचा: महापुरुषांच्या विषयावर राज ठाकरेंनी तुमचं ऐकलं का? अजित पवार म्हणाले, “ओठात एक आणि…”
गरीब आणि होतकरू मुलांना रायफल शूटिंगची आवड जोपासणे जवळपास अशक्यच आहे. कारण, महिन्याला खासगी ठिकाणी रायफल शूटिंगचे प्रशिक्षण घ्यायचे असल्यास प्रतिमहिना ५ ते १० हजार मोजावे लागतात. हेच लक्षात घेऊन मुख्याध्यापक चंद्रशेखर कदम ह्यांनी शाळेतच पार्किंगच्या ठिकाणी प्रशस्त असे रायफल शूटिंग प्रशिक्षण केंद्र उभारले आहे. योग्य प्रशिक्षण आणि अत्याधुनिक रायफल मिळाल्यास महानगर पालिकेच्या शाळेतील विद्यार्थी देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकीक मिळतील असा विश्वास मुख्याध्यापक चंद्रशेखर कदम यांनी व्यक्त केला आहे. गरीब आणि होतकरू मुलांना मोफत प्रशिक्षण मिळत असल्याचा आनंद आहे असे प्रशिक्षक विजय रणझुंजारे यांनी सांगितले. पिंपरी- चिंचवड महानगर पालिकेच्या शाळेत रायफल शूटिंगचे प्रशिक्षण केंद्र उभारणारी थेरगाव येथील ही पहिलीच शाळा आहे .