पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चिंचवड येथील राजर्षी शाहू उद्यानाचे पुनर्विकास काम निकृष्ट झाले असून, कामात अनियमितता झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कार्यकारी अभियंता आणि कनिष्ठ अभियंत्यांची खातेनिहाय चौकशी सुरू करण्यात आली आहे. ठेकेदार, सल्लागाराला काळ्या यादीत टाकण्याचा आदेश पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिला आहे.
राजर्षी शाहू उद्यानाच्या पुनर्विकासाचे काम करण्यासाठी महापालिकेने एक कोटी ६६ लाखांचा खर्च केला. मात्र, निविदेतील अटी व शर्तींनुसार उद्यानाचे काम न झाल्याचा आणि निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केला होता. या संदर्भात भापकर यांनी चार डिसेंबर २०२३ रोजी आयुक्त सिंह यांच्याकडे तक्रार केली होती. तक्रारीनंतर महापालिकेच्या दक्षता व गुणनियंत्रण विभागाने पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) भूशास्त्र विभागाच्या पथकाकडून कामाची तपासणी करून घेतली.
‘सीओईपी’च्या अहवालानुसार, उद्यानात बसविलेले ‘ट्रॅप स्टोन’ कमी आकाराचे असून, ॲल्युमिनिअमचे दंडगोलाकार २० खांब बसविणे अपेक्षित असताना ते सातच बसविल्याचे आढळून आले. महापालिकेचे आर्थिक नुकसान करणे, सुधारित अंदाजपत्रकाला तांत्रिक मान्यता न घेणे, जास्तीच्या कामांना मान्यता न घेणे, कामाचा दर्जा चांगला नसणे आदी आक्षेपही चौकशीतून समोर आले. त्यावरून हलगर्जीपणा व शिथिल पर्यवेक्षणाचा ठपका ठेवून, एक कार्यकारी अभियंता व एक कनिष्ठ अभियंता यांच्या खातेनिहाय चौकशीचा आदेश आयुक्त सिंह यांनी दिला आहे. सल्लागार व संबंधित काम करणारा ठेकेदार यांना काळ्या यादीत टाकण्यास आयुक्त सिंह यांनी मान्यता दिली. त्यानुसार कारवाई करण्यास शहर अभियंत्यांना सामान्य प्रशासन विभागाने कळविले आहे, अशी माहिती भापकर यांनी दिली.
‘उद्यानात सहा हजार ७८६ रुपये प्रतिचौरस मीटर ट्रॅप स्टोन दगडाऐवजी ४१४ रुपये प्रतिचौरस मीटर किमतीचा दगड बसविण्यात आला. त्याची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी,’ अशी मागणीही त्यांनी केली.
राजर्षी शाहू उद्यानाच्या कामाच्या तपासणीनंतर दोन अभियंत्यांविरुद्ध खातेनिहाय चौकशी सुरू झाली आहे. या प्रकरणातील संबंधित सल्लागार व ठेकेदारावर कारवाई करण्याबाबत अद्याप आदेश प्राप्त झालेले नाहीत. आदेश प्राप्त होताच कारवाई करण्यात येईल.- मकरंद निकम,शहर अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका