पुणे : विख्यात अर्थतज्ज्ञ डॉ. अजित रानडे यांच्या गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या कुलगुरु पदावरील नियुक्तीवरून निर्माण करण्यात आलेला वाद शमवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याचप्रमाणे डॉ. रानडे यांच्या नियुक्तीला आक्षेप घेणारे भारत सेवक समाजाचे पत्र कुणी, कसे आणि का जाहीर केले, याची चौकशीही सुरू करण्यात आल्याचे समजते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> आरक्षणाबाबत सरकारची भूमिका अस्पष्ट; सर्वपक्षीय बैठकीला न जाण्याबाबत शरद पवार यांचे स्पष्टीकरण

डॉ. रानडे यांच्याकडे कुलगुरूपदासाठी लागणारा दहा वर्षांचा अध्यापन अनुभव नसल्याचा एक आक्षेप होता. तसेच, रानडे संस्थेच्या व्यवस्थापन मंडळावर असूनही त्यांनी कुलगुरू शोध समितीच्या सदस्यपदी महेंद्र देव यांची निवड केल्याचा आणि याच समितीने रानडे यांची मुलाखत घेतल्याने यात हितसंबंध असल्याचा आक्षेप घेण्यात आला होता. याप्रकरणी गोखले संस्थेची पालक संस्था असलेल्या भारत सेवक समाजाचे सचिव मिलिंद देशमुख यांनी तत्कालीन कुलपती राजीव कुमार यांना पाठविलेल्या पत्राचा आधार घेतला गेला होता. त्याबाबत देशमुख म्हणाले, ‘डॉ. अजित रानडे यांची निवड कायदेशीररीत्या योग्य आहे.

डॉ. राजीव कुमार यांनी निवड करताना सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केल्या आहेत. मी जे पत्र लिहिले होते, त्यानुसार आता माझा कोणताही आक्षेप राहिलेला नाही. रानडे यांची नियुक्ती नियमानुसार आणि कायदेशीर आहे. काही असंतुष्ट लोकांचा आक्षेप असेल, तर कायदेशीर मार्गाचा वापर करावा, समाजात गैरसमज पसरवू नयेत.’ दरम्यान, ‘मुरली कृष्णा यांनी ५ जुलै रोजी डॉ. रानडे यांच्या नियुक्तीबाबत केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडे तक्रार केली. त्या संदर्भातील पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्रालयाने १० जुलै रोजी यूजीसीला दिले आहेत,’ असा दावा माजी विद्यार्थी नीलेश पाडेकर यांनी केला. डॉ. अजित रानडे यांनी मात्र त्यांच्या नियुक्तीवरील सर्व आरोप फेटाळून नियुक्ती नियमानुसार अतिशय पारदर्शक पद्धतीने झाल्याचे, तसेच वैधानिक प्राधिकरणांकडून वेळोवेळी विचारणा झाल्यावर स्पष्टीकरण दिल्याचे नमूद केले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inquiry set up on appointment of ajit ranade as vc of gokhale institute zws