प्रकाश आंबेडकर यांचे प्रतिपादन
एकच विचार प्रवाह पुढे घेऊन जाण्याचा सध्या आग्रह धरला जात आहे. तो हानीकारक आणि भयंकर आहे. त्यामुळे राष्ट्राला धर्म असावा की नाही, या विषयावर सविस्तर चर्चा झाली पाहिजे, असे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी केले. देशाची वाटचाल धार्मिक असुरक्षिततेकडे सुरू असल्याचेही ते म्हणाले.
वक्तृत्वोत्तेजक सभेच्या वतीने आयोजिलेल्या वसंत व्याख्यानमालेत प्रकाश आंबेडकर यांनी ‘राष्ट्राला धर्म असावा का’ या विषयावर मांडणी केली. यावेळी ते म्हणाले की, देशात न बदलणारी अशी एक तात्त्विक धर्म व्यवस्था आहे, तर दुसरी सांकेतिक धर्म व्यवस्था ही संतांनी सांगितलेली असून ती कालानुरूप बदलणारी आहे. तात्त्विक धर्म व्यवस्था ही महिलांना स्वातंत्र्य नाकारते, तर संतांची सांकेतिक धर्म व्यवस्था महिलांना स्वातंत्र्य देते. राष्ट्र एकाच धर्माचे असल्याचे जाहीर केल्यास इतर धर्मीयांच्या अस्तित्वाचे काय होणार आहे, असा प्रश्न उपस्थित करून आंबेडकर म्हणाले की, देशात २२ टक्के लोक धर्म असल्याचे सांगत नाहीत. मग या २२ टक्के लोकांचे एकाच धर्माच्या राष्ट्रात काय अस्तित्व राहणार आहे. अशावेळी इतर
धर्मीयांनी देशाचा जो धर्म असेल त्यात समाविष्ट व्हायचे की त्यांना संपवले जाणार.
सांकेतिक धर्म व्यवस्था आणि तात्त्विक धर्म व्यवस्था हे िहदू धर्माचे दोन विचार प्रवाह आहेत. मात्र, त्यामध्ये कधीही सामंजस्य निर्माण होऊ शकले नाही. त्यामुळे यातील कोणत्या धर्म व्यवस्थेनुसार देश चालणार आहे, असाही प्रश्न आंबेडकर यांनी उपस्थित केला. देशाला कोणताही धर्म नसावा, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मत होते. धर्म कोणावरही लादू नये, असे महात्मा गांधी यांचे मत होते. पण सध्या हाच प्रश्न गंभीर झाला आहे. राष्ट्राला एखादा धर्म असल्याचे जाहीर केल्यास त्यातून काय साध्य होणार आहे, असाही प्रश्न आंबेडकर यांनी उपस्थित केला. आपल्यावर सध्या कुणाचे राज्य नाही. आपलेच आपल्यावर राज्य आहे. वैचारिक मतभेद निश्चित आहेत, पण कोणी कुणाचे शत्रू नाहीत. त्यामुळे मनमोकळ्या पद्धतीने चर्चा झाली पाहिजे. सध्या देशामध्ये भीतीचे वातावरण आहे. लोक उघड बोलत नाहीत. ते दबक्या आवाजात बोलत आहेत. लोकांमध्ये निर्भयता राहिलेली नाही. लोक घाबरलेले आहेत. लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, असेही आंबेडकर म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा