पवना नदीच्या पात्रात होत असलेल्या प्रदूषणाबाबत खासदार श्रीरंग बारणे यांनी तक्रार केल्यानंतर महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी नदीपात्राची अधिकाऱ्यांसह पाहणी केली. यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
हेही वाचा- रुपाली पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसकडून कान उघाडणी
पवना नदीवरील केजुदेवी बंधारा येथे आठ दिवसांपूर्वी लाखो मासे मरण पावले होते. त्यामुळे त्या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती. तसेच नदीत्रात थेट सांडपाणी पाणी सोडले जात असल्याची तक्रार खासदार बारणे यांनी आयुक्तांकडे केली होती. या पार्श्वभूमीवर, आयुक्त व खासदार बारणे यांनी नदीपात्राची पाहणी केली. अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, पर्यावरण विभागाचे सहशहर अभियंता संजय कुलकर्णी, आरोग्य विभागाचे उपायुक्त अजय चारठणकर, युवा सेना अधिकारी विश्वजीत बारणे आदी उपस्थित होते.
हेही वाचा- नववर्षानिमित्त लोणावळ्यात कडक बंदोबस्त; हुल्लडबाजांवर कारवाईसाठी पथके
खासदार बारणे यांनी सांगितले की, गहुंजे गावातील गृहनिर्माण संस्थांमधून मोठ्या प्रमाणावर दूषित पाणी नदीपात्रात येते. पीएमआरडीए भागातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये दिखाव्यापुरतेच सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारले आहेत. मैलामिश्रित पाणी थेट नदीपात्रात सोडले जात आहे. दुषित पाण्यामुळे पवना नदीची गटारगंगा झाली आहे. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील घाण पाणीही नाल्याद्वारे थेट नदीत येत आहे. ताथवडे गावापासून एक मोठा नाला थेट नदीपात्राला जोडला आहे. त्यातूनही सांडपाणी नदीपात्रात जाते. पालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष यास कारणीभूत आहे. नदीचे प्रदुषण रोखण्याबाबत तातडीने उपाययोजना करावी.