पुणे रेल्वे स्थानकावर येणारा वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी खडकी येथे नवीन टर्मिनल करावे, अशी सूचना खासदार गिरीश बापट यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना केली होती. त्यानुसार रेल्वे अधिकारी तसेच लष्करी अधिकाऱ्यांकडून खडकी रेल्वे स्थानकाची पाहणी करण्यात आली. मध्य रेल्वे बोर्डाचे जनरल मॅनेजर अनिल लाहोटी, प्रिन्सिपल चीफ ऑपरेशन्स मॅनेजर मुकुल जैन, मुख्य व्यवस्थापक मनजित सिंग, विभागीय रेल्वे व्यवस्थापिका रेणू शर्मा, पुणे विभागाचे वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय संचालन डॉ. स्वप्नील नीला यांनी ही पाहणी केली.
हेही वाचा >>>ओमायक्रॉनच्या उत्परिवर्तित उपप्रकाराने बाधित भारतातील पहिला रुग्ण पुण्यात ; जनुकीय क्रमनिर्धारणातून उलगडा
पुणे रेल्वे स्थानकावरील भार कमी करण्यासाठी खासदार गिरीश बापट यांनी हडपसर रेल्वे स्थानकाचा विकास करणे तसेच खडकी येथे नवीन रेल्वे टर्मिनल तयार करणे हे उपाय सुचवले आहेत. याबाबत त्यांनी संसदेत मागणी करून केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पत्रव्यवहारही केला आहे. गेल्या महिन्यात रेल्वे अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीतही त्यांनी याबाबत प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली होती.
हेही वाचा >>>भाज्या आणखी महाग ; परतीच्या पावसाने पिके पाण्यात; आवक घटली
खडकी यार्ड येथे पूर्वी लष्कराच्या वापरासाठी रेल्वे रूळ बांधण्यात आले होते. मात्र २०२१ पासून लष्कराने याचा वापर बंद केला होता. लष्कर वापरत नसलेले हे रेल्वे रूळ रेल्वेकडे हस्तांतरित करण्याची तयारी लष्कराने दर्शवली आहे. त्यानुसार याबाबत प्रस्ताव विकसित करून मार्च २०२२ मध्ये रेल्वे मुख्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. लष्कराच्या वापरासाठी पर्यायी व्यवस्थेसह जमिनीचा आणि या रेल्वे लाईन्सचा प्रश्न सोडवण्यासाठी अभियंता विभाग आणि लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याबद्दल पाहणी दौऱ्यात चर्चा झाली.