गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय झाली आहे. तसंच, मुलींच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. पुण्यातील राजगड येथे एमपीएससी परीक्षेत राज्यातून तिसरी आलेल्या दर्शना पवार हिची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणाला आठवडा उलटत नाही तोवर मंगळवारी पुन्हा एका तरुणाने त्याच्या मैत्रिणीवर कोयत्याने हल्ला केला. दिवसाढवळ्या भररस्त्यात हा तरुण हातात कोयता घेऊन तरुणीच्या मागे धावला, परंतु, तरीही अनेकांनी बघ्याची भूमिका घेतली. यावेळी लेशपाल जवळगे या एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या तरुणाने जीवाची बाजी लावत त्या तरुणीला माथेफिरूच्या तावडीतून सोडवलं. या लेशपाल जवळगेची इन्स्टाग्राम स्टोरी सध्या बरीच चर्चेत आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वीस वर्षीय तरुणी कोथरूड येथील सुतरदारा भागात राहायला आहे. आरोपी शंतनु जाधव तरुणीवर एकतर्फी प्रेम करत होता. तिचा पाठलाग करून त्रास देत होता. त्याने सदाशिव पेठेत पावन मारुती मंदिराजवळ सकाळी तरुणीला गाठले. तरुणीला अडवून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तरुणीने त्याला झिडकारले. तेव्हा त्याने तिच्यावर कोयत्याने वार केले. 

हेही वाचा >> “तो तिच्यावर कोयत्याने वार करणार तेवढ्यात…”, पुण्यातील कोयता हल्ल्यातून तरुणीला वाचवणाऱ्या तरुणांनी सांगितला घटनाक्रम!

भररस्त्यात हा थरार सुरू असताना अनेकांनी बघ्याची भूमिका घेतली. मात्र, मुलीच्या ओरडण्याचा आवाज येताच लेशपाल जवळगे याने पीडितेच्या दिशेने धाव घेत तिला कोयत्याच्या हल्ल्यातून वाचवलं. पीडिता मदतीसाठी हाका मारत होती, तरीही तिच्या मदतीला कोणी आलं नाही. तेव्हा लेशपाल याने आपल्या जीवाची पर्वा न करता कोयता हातात घेऊन पीडितेच्या दिशेने धावणाऱ्या तरुणाला मागून दोन्ही हातांनी पकडलं. तिच्यावर वार होण्याआधीच लेशपालने तो वार उलटवला, त्यामुळे या पीडितेचा जीव वाचला.

हेही वाचा >> लेशपाल…! कुठे कुठे आणि कसा पोहोचणार? बघ्यांच्या समाजात बाई तू…

लेशपालने केलेल्या या धाडसाचं सर्वत्र कौतुक होतंय. राजकारण्यांपासून ते सर्वसामान्यांपासून सर्वांनी त्याचं कौतुक केलंय. परंतु, त्याला इन्स्टाग्रामला वेगळेच मेसेज येऊ लागले आहेत. या मुलाची आणि मुलीची काय जात होती, असे प्रश्न विचारले जात असल्याचा दावा लेशपालने केलाय. त्याने यासंदर्भात इन्स्टाग्रामला स्टोरी ठेवली आहे.

लेशपाल जवळगेने इन्स्टाग्राम स्टोरीत काय म्हटलंय?

तो इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये म्हणतोय की, “त्या मुलीची आणि मुलाची जात कुठली होती असं मला DM करून विचारणाऱ्या सडक्या बुद्धीजीवांनो विनंती आहे की ते मेसेज डिलिट करा. ना तुम्ही तुमच्या जातीचे होऊ शकता. ना ही समाजाचे. कीड लागली आहे तुमच्या वरचा थोड्याफार असलेल्या भागाला.”

लेशपालच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत असताना, त्याने मात्र माझं कौतुक करू नका असं म्हटलं आहे. फेसबूक पोस्ट करत तो म्हणतो की, “सगळीकडून कौतुक होतंय खरं पण हे माझं कर्तव्य होतं , उलट तुम्ही माझं कौतुक करून उपकाराची भावना दाखवताय… मी त्या ताईवर उपकार नाहीत केले मी माझं कर्तव्य पार पाडलं … तरीही सर्वांचे खुप खूप आभार.”

लेशपालने कसा वाचवला तरुणीचा जीव?

“मी सकाळी नऊ-साडेनऊ वाजता अभ्यासिकेत येत होतो. मी पायऱ्यांवरून वर चढायला जात होतो तेवढ्यात मला मोठा आवाज आला. मी मागे वळून पाहिलं तर एका मुलीवर वार झाला होता. ती माझ्या दिशेनेच पळत आली. तो तिच्या मागून कोयता घेऊन धावतोय. ही सामाजिक विकृती आहे की तो कोयता घेऊन मागून पळतोय आणि पोरगी ओरडत वाचवा म्हणून पळतेय, तरी लोक बघत बसलेत. तिला वाचवायचं सोडून लोक आजूबाजूला सरकले. ती पळत पळत दुकानात गेली. ती दुकानात आत जाण्याचा प्रयत्न करत असताना दुकानवाल्याने शटर खाली खेचलं. त्यामुळे ती दुकानाच्या दारात बसली. तो खूप रागात होता, तो तिला मारणारच होता. त्यामुळे मी पळत गेलो. तो कोयत्याने तिच्यावर वार करणार तेवढ्यात मी मागून त्याला पकडलं. तेवढ्यात हा (हर्षद पाटील) मदतीला आला. जे आधी बघत होते, तेच तिला वाचवायला आले. पण तीन-चार सेकंदात ती पोरगी वाचली”, अशी अंगावर काटा आणणारी हकिगत लेशपाल जवळगेने सांगितली.

हेही वाचा >> पुण्यातील कोयता हल्ल्यावरून राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाले, “माझ्या महाराष्ट्र सैनिकांना…”

“दर्शना पवार ताईंची ताजी केस असताना समाज आपली जबाबदारी झटकतोय. हे पाहत असताना वाईट वाटतं”, असंही लेशपाल म्हणाला. “दिल्लीत झालेली केस माहित होती, व्हिडीओ पाहिला होता. व्हिडीओ पाहत असातनाही मी तेव्हा (व्हिडीओतील)आजूबाजूच्या लोकांना शिव्या देत होतो. तो मारतोय तुम्हाला दिसत नाहीय का? हाच प्रसंग माझ्यासमोर आला होता. मला काय झालं माहित नाही. मी पळत सुटलो. काय होईल ते होईल बिचारी पोरगी वाचेल. हे प्रकरण झाल्यानतंर मी खोलीवर गेलो. खोलीवर एक दीड तास खूप रडलो. आताही मला रडू येतंय. ती पोरगी मेली असती. पण एका सेकंदामुळे ती वाचली”, असंही लेशपालने सांगितलं.

“मी खोलीमध्ये जाऊन खूप रडलो. कारण अजून ३ सेकंद मला वेळ झाला असता तर मला सर्वांना सांगावं लागलं असतं की तिचा खून कसा झाला? आणि असं झालं असतं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो”, असंही लेशपालने सांगितलं.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Instagram story of leshpal javalge who saved pune girl from koyata attacked sgk
Show comments