पिंपरी पालिकेने खेळाडू दत्तक योजनेत प्रतिदिन ५० रुपये आहारभत्ता देण्याचे जाहीर केल्यानंतर नगरसेवकांनी तीव्र संताप व्यक्त केला व खेळाडूंनीही नाराजी व्यक्त केली, त्याची दखल घेत महापौर मोहिनी लांडे यांनी हा भत्ता २०० रुपयांपर्यंत वाढवू, अशी घोषणा गुरुवारी केली. त्याचप्रमाणे, क्रीडा धोरणात कुस्तीसह अन्य क्रीडा प्रकारांचाही समावेश करू, असे स्पष्ट केले.
भोसरी-इंद्रायणीनगर येथे पालिकेच्या खेळाडू दत्तक योजनेचे उद्घाटन महापौरांच्या हस्ते झाले. क्रीडा समितीच्या सभापती वनिता थोरात, शिक्षण मंडळ सभापती विजय लोखंडे, शहर सुधारणा समितीच्या अध्यक्षा शुभांगी बोऱ्हाडे, प्रभाग अध्यक्ष सुरेखा गव्हाणे, यमुना पवार, जावेद शेख, गोपाल देवांग, नगरसेवक संजय वाबळे, नितीन लांडगे, रामदास बोकड, वैशाली काळभोर, वर्षां मडेगिरी, मंदाकिनी ठाकरे, शैलजा शितोळे आदी या वेळी उपस्थित होते.
खेळाडू दत्तक योजनेत प्राप्त ९४ अर्जापैकी ८३ खेळाडू पात्र ठरले असून त्यांना पालिकेकडून आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यापूर्वी, खेळाडूंना प्रतिदिनी ५० रुपये आहारभत्ता देण्याचे ठरले होते. मात्र, त्यावरून तीव्र नाराजी पसरली, त्यामुळे त्यात फेरबदल करत महापौरांनी भत्त्याची रक्कम वाढवण्याची भूमिका घेतली. पालिकेने सुरू केलेल्या या योजनेचा अधिकाधिक खेळाडूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापौरांनी केले आहे.