पुणे: पावसाळी वाहिनीवरील झाकण खचल्याने तेथे दगड ठेवण्यात आले आहेत. त्यातून अपघाताचा धोका वाढला आहे, अशी तक्रार एका सजग नागरिकाने महापालिकेच्या ‘पीएमसी केअर’ प्रणालीवर केली. मात्र त्या झाकणाची दुरुस्ती करण्याऐवजी महापालिकेने झाकणावर लहान दगडाऐवजी मोठा दगड ठेवून तक्रार बंद करत असल्याचे तक्रारदाराला कळविले. महापालिकेच्या या अजब दगडी कारभाराची मात्र चर्चा सुरू झाली आहे.
सजग नागरिक संजय शितोळे यांनी कात्रज-कोंढवा रस्त्यावरील बुऱ्हानी कॉलनीजवळ रस्त्यावरील पावसाळी वाहिनीचे झाकण धोकादायक झाले असून तेथे दगड ठेवण्यात आला आहे. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे, अशी तक्रार पीएमसी केअर या तक्रार निवारण प्रणालीवर केली होती. तक्रार केल्यानंतर त्यांना नोंद क्रमांक मिळाला आणि तक्रारीची सोडवणूक झाली आहे, त्याची तपासणी करा, असे सांगण्यात आले. तक्रारीचे निवारण झाल्याने तक्रार बंद करण्यात येत असल्याचेही त्यांना कळविण्यात आले. त्यानुसार शितोळे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली, तेव्हा झाकणावरील छोटा दगड काढून तेथे मोठा दगड ठेवण्यात आल्याचे त्यांना आढळून आले. त्यामुळे महापालिकेच्या पीएमसी केअर प्रणालीवरी प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, समस्या सोडविण्याऐवजी त्या वाढविण्यात येत असल्याचा महापालिकेचा कारभारही यामुळे अधोरेखीत झाला.
हेही वाचा… साडेतीन वर्षांनंतर ‘जायका’च्या कामाचा आढावा
नागरिकांना भेडसाविणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी पीएमसी केअर ही प्रणाली सुरू करण्यात आली आहे. महापालिका प्रशासनाकडून या प्रणालीचा मोठा गाजावाजाही करण्यात येत आहे. तक्रार निवारण आणि अन्य कामांसाठी या प्रणालीवर वार्षिक एक कोटींचा खर्च महापालिकेकडून केला जात आहे. मात्र, त्यानंतरही या प्रणालीकडून तक्रारादारांच्या समस्येची केवळ कागदोपत्री दखल घेतली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे समस्याही कायम राहत आहेत.