महापालिकेतर्फे सहकारनगरमधील अध्यापक कॉलनीत प्रस्तावित करण्यात आलेली तारांगण उभारण्याची योजना वादग्रस्त ठरली असून या भागातील रहिवाशांनी तारांगण नको, क्रीडांगण हवे अशी जोरदार मागणी नागरिकांच्या सभेत केली.
अध्यापक कॉलनीमधील क्रीडांगणावर स्थानिक नगरसेवक आबा बागूल यांच्या संकल्पनेतून तारांगण प्रकल्प उभारण्याची योजना महापालिकेने आखली आहे. मात्र, एक चांगले क्रीडांगण उद्ध्वस्त करून येथे तारांगण प्रकल्प करण्याची गरज नाही, असे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. या योजनेची माहिती देण्यासाठी बागूल यांनी सभा बोलावली होती. सभेत बागूल यांनी योजनेची सर्व माहिती दिली.
श्री अरण्येश्वर सांस्कृतिक व क्रीडा मंडळाच्या प्रतिनिधींनी तसेच परिसरातील सर्व रहिवाशांनी सभेत तारांगण योजनेला एकमुखी विरोध दर्शवला. बिपीन पोतनीस, शिरिष दसनूरकर, सोहम महाजनी, अरुण भालेराव आदींची या सभेत प्रातिनिधिक भाषणे झाली. सर्व योजना पूर्ण झाल्यानंतर फक्त औपचारिकता म्हणून सभा बोलावण्यात आली आहे. आम्हाला या प्रकल्पापेक्षा क्रीडांगणाची गरज आहे. या भागातील रस्ते, सोसायटीचे अंतर्गत रस्ते असल्यामुळे येथे वाहतुकीचे प्रश्न निर्माण होतील. योजना चांगली आहे. योजनेला रहिवाशांचा विरोध नाही. मात्र, मैदानी खेळांसाठी एवढेच क्रीडांगण असल्यामुळे तेथे तारांगण करणे योग्य ठरणार नाही. आम्ही संघर्ष करून मैदान वाचवले आहे, अशी भावना सभेत नागरिकांनी व्यक्त केली.