पुणे: ओडिशातील बालासोर येथील रेल्वे दुर्घटनेनंतर रेल्वे मंत्रालयाने सुरक्षिततेसाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मागील काही वर्षात रेल्वेकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने स्वयंचलित सिग्नल यंत्रणेसह सुरक्षेच्या इतर उपाययोजनांवर भर दिला जात होता. मानवी हस्तक्षेप कमीत कमी करण्याचा प्रयत्न सुरू होता. आता रेल्वेने स्वयंचलित यंत्रणेऐवजी मानवी तपासणीवर भर देण्यास सुरुवात केली आहे.
रेल्वेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत रेल्वेच्या सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यात रेल्वेच्या सुरक्षा यंत्रणांबाबत महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या. केवळ स्वयंचलित यंत्रणा आहे म्हणून त्यावर विसंबून न राहता तिची प्रत्यक्ष तपासणी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी करावी, असे निर्देश देण्यात आले. स्वयंचलित यंत्रणेवर अवलंबून राहण्याऐवजी कर्मचाऱ्यांचा हस्तक्षेप वाढवावा, अशा सूचनाही करण्यात आल्या.
आणखी वाचा-शेतकऱ्यांच्या खात्यात चार तासांत कर्जाची रक्कम, राज्य सहकारी बँकेची अभिनव योजना
मागील काही काळात रेल्वेने मोठ्या प्रमाणात आधुनिकीकरणाची पावले उचलली होती. यात सुरक्षाविषयक यंत्रणाही आधुनिक करून त्यातील मानवी हस्तक्षेप कमी करण्यावर भर देण्यात आला होता. बालासोरमधील दुर्घटनेनंतर रेल्वेने उलटा प्रवास सुरू केला आहे. केवळ तंत्रज्ञान आणि आधुनिकीकरण केलेल्या यंत्रणेवर विसंबून राहू नये, अशी भूमिका घेण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांचा या प्रक्रियेत आधी कमी करण्यात आलेला सहभाग पुन्हा वाढवावा, असे प्रयत्न सुरू झाले आहेत.
रेल्वे मंडळाने नुकतेच एक परिपत्रक याबाबत काढले होते. देखभाल आणि दुरुस्तीच्या कामात कोणतीही कसूर केली जाऊ नये, असे त्यात म्हटले होते. याचबरोबर देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी असणाऱ्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जास्तीत जास्त वेळ द्यावा, असेही म्हटले होते. अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांशी सातत्याने संवाद साधून प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे, याचा आढावा घ्यावा, असेही त्यात नमूद केले होते.
कामाच्या ठिकाणी थांबा
सर्व विभागांतील निरीक्षकांना कार्यस्थळी जाऊन तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याचबरोबर वरिष्ठ अधिकारी कार्यालयात बसण्याऐवजी लोहमार्ग आणि स्थानकांमध्ये जाऊन सुरक्षा आणि देखभालीची पाहणी करीत आहेत. सुरक्षेत कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी विभागीय पातळीवर निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.