पुणे : शाळकरी मुलांवर नृत्य शिक्षकाने अत्याचार केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात पोलिसांनी संस्थाचालकाला गुरुवारी अटक केली.कर्वेनगर भागातील एका नामांकित शाळेतील नृत्य शिक्षकाने शाळकरी मुलांना मोबाइलवर अश्लील चित्रफीतदाखवून त्यांच्यावर अत्याचार केले. मुलांवर अत्याचार प्रकरणात त्याने मोबाइलवर चित्रीकरण केले, तसेच चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी दिली. या प्रकारची वाच्यता केल्यास मारहाण करण्याची धमकी दिली. त्यानंतर याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल केला. पोलिसांनी नृत्य शिक्षकाला अटक केली. त्याच्याविरुद्ध वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात अत्याचार प्रकरणात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले.
नोव्हेंबर महिन्यापासून हा प्रकार सुरू होता. या प्रकरणात पोलिसांकडे तक्रार आल्यास त्वरीत कारवाई करण्यात आली. नृत्य शिक्षकाला अटक करण्यात आली, तसेच संस्थाचालकांनी निष्काळजीपणा दाखविल्याप्रकरणी त्यांनाही अटक करण्यात आली, असे परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले.
हेही वाचा >>>एकही पैसा खर्च न करता ससूनचे मासिक वीज बिल एक कोटी रुपयांवरून ५० लाखां
पालकांची पोलीस आयुक्तांशी भेट
या शाळेतील आणखी काही मुलांवर अत्याचार करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणाचा सखोल तपास यावा, अशी मागणी पालकांनी केली. पालकांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली. त्यांना निवेदन दिले. शालेय प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडली आहे. संबंधित संस्थेचे चालक आणि विश्वस्त या घटनेला जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्यावरही पोलिसांनी कारवाई केली. शाळेत मुलांचे समुपदेशन केले जात नाही. मुलांना योग्य आणि अयोग्य (गुड टच, बॅड टच) स्पर्शाबाबत माहिती दिली नाही. संस्थेच्या प्रशासनाकडून हे प्रकरण गांभीर्याने घेतले गेले नाही. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास करुन दोषींवर कारवाई व्हायला हवी. शिक्षकांचे चारित्र्य प्रमाणपत्र तपासले जात नाही. शालेय प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अशा प्रकारच्या घटना घडतात, असे पालकांनी पोलीस आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले.