पुणे: प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांकडून वाढीव दराने दंड वसूल करण्यापेक्षा नागरिकांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करु नये, यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे. यासाठी महापालिकेने प्लास्टिक पिशव्यांच्या वापरासाठीचा दंड कमी करण्याची आवश्यकता आहे, अशी सूचना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे (एमपीसीबी) अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी महापालिका आयुक्तांना केली. दंड वसुलीच्या नियमात बदल करुन महापालिकेने हा दंड कमी करण्याचा प्रयत्न करावा, अशी अपेक्षाही कदम यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्यासह प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुणे महापालिकेला भेट देत प्रदूषण नियंत्रण उपाययोजनांविषयी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती घेतली. महापालिका प्रशासनातील विविध विभागांचे प्रमुख आणि एमपीसीबी अधिकाऱ्यांची बैठक झाली. या वेळी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी.पी., ड्रेनेज विभागाचे उपायुक्त जगदीश खानोरे, घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम, विद्युत विभागाच्या मुख्य अभियंता मनीषा शेकटकर आणि पर्यावरण विभागाचे अधिकारी मंगेश दिघे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा >>>पुणे: पुढील २० वर्षांच्या प्रदूषणाचे नियोजन करा, प्रदूषण महामंडळाच्या सूचना !
बंदी घातलेल्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरामुळे मोठ्या प्रमाणात पर्यावणाची हानी होते. असे असतानाही अनेकदा प्लास्टिक पिशव्यांचा वापर सर्रासपणे विक्रेत्यांकडून तसेच नागरिकांकडून केला जातो. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करुन प्लास्टिक वापरण्याचे प्रमाण कमी होणार नाही. नागरिकांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करु नये, यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे. यासाठी महापालिकेने आपल्या स्तरावर आपल्या उपविधींनुसार प्लास्टिक पिशव्यांच्या वापराबाबतचा दंड कमी करावा, अशी सूचना कदम यांनी या बैठकीत केली.
हेही वाचा >>>तीर्थक्षेत्र दर्शनासाठी राज्याला अतिरिक्त रेल्वे गाड्यांची प्रतीक्षा; कुंभमेळ्यामुळे गाड्यांची कमतरता
शहरातील मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पांची पाहणी करणार
शहरातील नदी-नाल्यांमध्ये सर्रासपणे मैलापाणी सोडले जात असल्याने पाण्याचे प्रदूषण होते. यासाठी महापालिकेने शहरातील विविध भागात मैलापाणी शुद्धीकरण केंद्र उभारण्यात आली आहेत. या केंद्रांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली जाणार असल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. प्रत्येक केंद्राला भेट देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.