दत्ता जाधव, लोकसत्ता
पुणे : खरीप हंगामाच्या विविध टप्प्यांवर झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी पीकविमा कंपनीकडून देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईस दिरंगाई झाली आहे. आतापर्यंत मंजूर झालेल्या १७९१.५३ कोटींच्या भरपाईपैकी केवळ ३१८.८६ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा करण्यात आले आहेत.
प्रामुख्याने भारतीय कृषी विमा कंपनी आणि युनायटेड इंडिया यांच्याकडून शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित असलेली भरपाई रखडल्याची माहिती कृषी विभागाचे मुख्य सांख्यिकी अधिकारी विनय कुमार आवटे यांनी दिली. शेकऱ्यांना आजवर १७९१.५३ कोटींची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. त्यापैकी आठ लाख ७८ हजार ५५१ लाभार्थ्यांच्या खात्यांवर ३१८.८६ कोटी जमा झाले असून अद्याप १४७२.६७ कोटी रुपये जमा करणे बाकी आहे. या शिवाय अद्याप सहा लाख सूचनांचे सर्वेक्षण बाकी आहे, त्यानंतर भरपाई निश्चिती आणि रक्कम जमा होण्याची प्रक्रिया होणार आहे.
स्थानिक नैसर्गिक आपत्तीअंतर्गत नुकसान झाल्याच्या ५१ लाख ३१ हजार सूचना आल्या होत्या. त्यापैकी ४६ लाख नऊ हजार सूचनांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे, अद्याप ५ लाख २१ सूचनांचे सर्वेक्षण बाकी आहे. सर्वेक्षण झालेल्या सूचनांपैकी १७ लाख २५ हजार अर्जासाठी १०७४ कोटी रुपयांची रक्कम मंजूर झालेली आहे, तर अद्याप १९ लाख ७७ हजार अर्जाची नुकसानभरपाई रक्कम निश्चित करणेच बाकी आहे. १०७४ कोटींची नुकसान भरपाई मंजूर झाली असली तरीही आजवर शेतकऱ्यांच्या खात्यावर फक्त ९६.५३ कोटींचीच रक्कम जमा झाली आहे. विमा कंपन्यांच्या दिरंगाईमुळे सूचनांचे सर्वेक्षण करणे आणि नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करणे आणि निश्चित झालेली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणे, या तिन्ही पातळीवर विमा कंपन्यांकडून दिरंगाई सुरू आहे.
मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीमध्ये एकूण सोळा जिल्ह्यांना मदत देण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत, त्यापैकी अकोला, अमरावती आणि सोलापूर जिल्ह्यांबाबत विमा कंपन्यांनी काही आक्षेप घेतले आहेत. संबंधित कंपन्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन लवकरात लवकर मार्ग काढण्यांचे आदेश दिलेले आहेत. मध्य हंगाम नुकसानी पोटी १६ जिल्ह्यांतील १५.४२ लाख शेतकऱ्यांना ७१७.९५ कोटींची भरपाई रक्कम निश्चित झाली आहे. त्यापैकी ४.२० लाख शेतकऱ्यांच्या खात्यांवर १७२.३४ कोटींची रक्कम जमा झाली आहे, तर अद्याप ५४६ कोटींची रक्कम जमा होणे बाकी आहे.
ऑक्टोबरमध्ये परतीच्या पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांच्या नुकसानीच्या ४.८६ लाख सूचना आल्या होत्या. त्यापैकी ३.६२ लाख सूचनांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे, तर १.२४ लाख सूचनांचे सर्वेक्षण सुरू आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
भारतीय कृषी विमा कंपनी आणि युनायटेड इंडिया यांच्याकडून मिळणारी भरपाई रखडली आहे. त्यांनी आठ दिवसांत ही रक्कम जमा करावी. रखडलेले सर्वेक्षण पूर्ण करून प्रथम भरपाईची रक्कम निश्चित करावी आणि तातडीने ती शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.
– विनय कुमार आवटे, मुख्य सांख्यिकी, कृषी विभाग
मंजूर भरपाई : १७९१.५३ कोटी
एकूण वितरण : ३१८.८६ कोटी
लाभार्थी : ८, ७८, ५५१
प्रलंबित : १४७२.६७ कोटी रुपये