पुणे शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण झालेली वाहतुकीची समस्या दूर करण्यासाठी लवकरच एकात्मिक वाहतूक योजना तयार करण्यात येणार असून, त्यासाठी रेल्वे, एसटी, पीएमपी व विमान वाहतुकीचा एकत्रित आढावा घेण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी शनिवारी दिली.
पुणे रेल्वे स्थानकावरील एक ते तीन क्रमांकाच्या फलाटांना जोडणाऱ्या पादचारी पुलाचे उद्घाटन प्रभू यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. समाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, श्रीरंग बारणे, संजयकाका पाटील, मध्य रेल्वेचे व्यवस्थापक सुनीलकुमार सूद, पुणे विभागाचे व्यवस्थापक बी. के. दादाभोय आदी त्या वेळी उपस्थित होते.
प्रभू म्हणाले,‘‘ मागील काही वर्षांमध्ये पुण्यात वाहतुकीची समस्या वाढली आहे. त्या दृष्टीने ही योजना तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी शहरातील सर्व वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेऊन नागरिकांना एक चांगली वाहतूक व्यवस्था पुरविण्यात येणार आहे. यासंदर्भात आजच लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे. रेल्वेच्या विकासाच्या दृष्टीने पायाभूत सुविधा व सेवा असे दुहेरी धोरण अवलंबण्यात येत आहे. पुढील तीन ते चार वर्षांमध्ये रेल्वेचे मोठे जाळे तयार करण्याचे ध्येय आहे. राज्यात पीपीपी तत्त्वावर एक संयुक्त कंपनी तयार करून त्याद्वारे योजना करण्यात येतील.’’
पुणे ते दौंड लोहमार्गाच्या विद्युतीकरणाचे काम जूनपर्यंत पूर्ण करण्यात येणार असून, या मार्गावर उपनगरीय गाडय़ा सुरू करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे पुणे- लोणावळा मार्गाच्या तीनपदरीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून, त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली असल्याची माहितीही प्रभू यांनी या वेळी दिली.

रेल्वेच्या परीक्षा ऑनलाईन घेणार
रेल्वेच्या भरतीमध्ये यापूर्वी अनेक गैरप्रकार झाल्याची बाब समोर आली असल्याने यापुढे रेल्वेच्या सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. ऑनलाईन पद्धतीमुळे दलालांना चाप बसणार आहे. विशेष म्हणजे इतक्या मोठय़ा प्रमाणावर ऑनलाईन परीक्षा घेण्याची ही जगातील पहिलीच घटना ठरेल. निविदांची प्रक्रियाही ऑनलाईन करण्यात येणार आहे. पुढील काळात कोणालाही दलालांमार्फत नोकरी मिळणार नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा कोणत्याही व्यक्तीच्या आश्वासनांना बळी पडू नये, असे आवाहनही प्रभू यांनी केले.

Story img Loader