एकात्मता, प्रेम व शांतीची शिकवणूक ही भारतीय संस्कृतीची ताकद आहे. ही संस्कृती टिकवून ठेवण्याचे काम इस्कॉनसारख्या संस्थांच्या माध्यमातून होत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केले.
इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेसच्या (इस्कॉन) वतीने कोंढवा येथे बांधण्यात आलेल्या वेदिक सांस्कृतिक केंद्राचे उद्घाटन रविवारी राष्ट्रपतींच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. राज्यपाल के. शंकरनारायण, राज्याचे सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील, महापौर वैशाली बनकर, सुप्रसिद्ध अभिनेत्री व खासदार हेमा मालिनी, इस्कॉनचे गोपालकृष्ण गोस्वामी, राधानाथ स्वामी, राधेश्याम दास, गुरुचरण दास आदी त्या वेळी उपस्थित होते.
राष्ट्रपती म्हणाले, पुणे ही ऐतिहासिक, सांस्कृतिक व चळवळीची भूमी आहे. त्यामुळे पुणे मला नेहमी आकर्षित करते. स्वातंत्र्याची चळवळ, समाजसुधारणा, शिक्षण, राजकारण आदी चळवळीतून या शहराने देशाला नेतृत्व दिले. अशा पुणे शहरामध्ये इस्कॉनचे केंद्र उभे राहणे साहजिकच आहे. त्यामुळे या शहराच्या नावलौकिकात भरच पडेल. इस्कॉनची चळवळ खूप जुनी आहे. या चळवळीने मानवतेचा संदेश दिला. भगवद् गीतेची शिकवण दिली. जाती-पातीच्या पलीकडे जाऊन हा मानवतेचा संदेश शिकविला. आधुनिक राष्ट्रवादाची भूमिका यामधून दिसून येते. ही जगासाठी एक शिकवणूक आहे. त्याग, एकात्मता, प्रेम ही भारतीय संस्कृतीची तत्त्वे आहेत. ही संस्कृती टिकविण्याचे काम इस्कॉनच्या माध्यमातून केले जात आहे.
गोस्वामी म्हणाले, वेदिक काळापासूनच्या भारताच्या समृद्ध संस्कृतीची ओळख करून देत प्रबोधन करण्याच्या दृष्टीने या केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा